नवी दिल्ली – दिल्लीच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी प्रचंड गदारोळात आज निवडणूक पार पडली. या निवडणूकीत आम आदमी पक्षाने (आप) पुन्हा दिल्ली महापालिकेवर आपली पकड कायम राखली आहे. दिल्ली महापौरपदाच्या निवडणुकीत आपचे नेते महेश खिंची विजयी झाले आहेत. खिंची हे भाजपच्या उमेदवाराचा पराभव करत दिल्लीचे महापौर बनले आहेत. महेश खिंची यांना एकूण 265 मते पडली. त्यापैकी 2 अवैध ठरले. खिंची यांना 133, तर भाजपचे प्रतिस्पर्धी किशन लाल यांना 130 मते मिळाली.
विशेष म्हणजे भाजपकडे केवळ 120 मते होती. असे असतानाही भाजपला आणखी 10 मते मिळाली. याचा अर्थ आपच्या दहा नगरसेवकांनी भाजपच्या बाजूने क्रॉस व्होट केले. तसेच आपकडे 142 मते होती, ज्यात तीन राज्यसभा खासदार, 13 आमदार आणि 126 नगरसेवकांचा समावेश आहे. 46 वर्षीय खिंची करोलबागच्या देवनगर वॉर्डातून आपचे नगरसेवक आहेत.
पीठासीन अधिकारी सत्य शर्मा यांच्या देखरेखीखाली दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास या पदासाठी मतदानाला सुरुवात झाली. महापौर झाल्यानंतर महेश खिंची म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी ज्या पद्धतीने दिल्लीतील जनतेसाठी काम केले. तसेच शहराच्या स्वच्छतेसाठी काम करण्याला माझे प्राधान्य असेल. आम्ही दिल्लीतील लोकांसाठी काम करू, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मतदानापूर्वी काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘आप’च्या महापौरांवर दलितांचे हक्क डावलल्याचा आरोप करत सभागृहात गोंधळ घातला. काँग्रेस नगरसेवकांनी ‘केजरीवाल दलितविरोधी’ अशा घोषणा दिल्या. काँग्रेसच्या सर्व 8 नगरसेवकांनी सभागृहातून सभात्याग केला. काँग्रेसचे सात नगरसेवक आणि स्वाती मालीवाल यांच्यासह एकूण आठ जणांनी मतदान केले नाही. स्वाती मालीवाल भारताबाहेर असल्याने त्यांनी मतदान केले नाही.