नवी दिल्ली – तळीरामांसाठी मोठी खूशखबर समोर आली आहे. राजधानी दिल्लीत आता लवकरच दारूची होम डिलिव्हरी मिळणार आहे. दिल्ली सरकारमधील मंत्र्यांच्या गटाने यासंदर्भात शिफारशी केल्या आहेत. या प्रस्तावाला दिल्ली मंत्रिमंडळाची मंजुरी मिळताच दिल्लीत दारूची होम डिलिव्हरी सुरू होईल.
ज्याप्रमाणे घरबसल्या ऑनलाइन जेवण ऑर्डर करू शकता, त्याचप्रमाणे दिल्लीकरांना लवकरच घरबसल्या दारूची ऑर्डर देता येणार आहे. दिल्ली सरकारच्या मंत्र्यांच्या गटाच्या (GOM) शिफारसी मंजूर होताच ही सुविधा सुरू होईल. किरकोळ मद्यविक्रेत्यांकडून दारूच्या एमआरपीवर दिल्या जाणाऱ्या सवलतीवर कोणतेही बंधन नसावे, असा सल्लाही जिओमने दिला आहे. दारूच्या होम डिलिव्हरीचा हा प्रस्ताव कॅबीनेटकडे पाठवण्यात आला आहे.
दिल्ली उत्पादन शुल्क धोरण 2022-23 अंतर्गत, मद्याची होम डिलिव्हरी आणि संपूर्ण मंत्र्यांच्या इतर शिफारशींचा प्रस्ताव मंजुरीसाठी दिल्ली मंत्रिमंडळासमोर ठेवला जाईल. गेल्या महिन्यात राज्य सरकारची बैठकही झाली होती. एका अधिकृत दस्तऐवजात त्याचा हवाला देऊन, असे म्हटले आहे की GOM ने शिफारस केली आहे की दिल्लीतील किरकोळ दारूच्या दुकानातून मद्याची होम डिलिव्हरीसाठी संमती दिली जावी.
मंत्रिमंडळाने जीओएमच्या दारूची होम डिलिव्हरी देण्याच्या प्रस्तावांना मंजुरी दिल्यानंतर, उत्पादन शुल्क विभाग दिल्ली उत्पादन शुल्क कायद्याच्या तरतुदी लक्षात घेऊन होम डिलिव्हरी प्रणाली लागू करण्यासाठी नियम तयार करेल, जसे की कमी वयाच्या व्यक्तींना दारू वितरीत केली जाणार नाही याची खात्री करणे. विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, नियोजन विभागाने दारूच्या होम डिलिव्हरीबाबत योग्य धोरण तयार करावे, असा सल्ला दिला आहे.