नवी दिल्ली – लोक जनशक्ती पक्षावर (लोजप) ताबा मिळवण्यासाठी गृहकलहाला सामोरे जात असलेले नेते चिराग पासवान यांना शुक्रवारी दिल्ली उच्च न्यायालयाने दणका दिला. चिराग यांचे काका पशुपतीकुमार पारस यांच्या नावावर लोजपचे लोकसभेतील नेते म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्या त्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका चिराग यांनी दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने ती फेटाळून लावली.
लोकसभेच्या सभापतींना सभागृहातील वादांचे नियमन करण्याचा विशेषाधिकार आहे. त्यामुळे याचिका विचार करण्याजोगी नसल्याचे म्हणत न्यायालयाने ती फेटाळून लावली. त्यामुळे काका-पुतण्या वादात चिराग यांची तूर्त पीछेहाट झाल्याचे मानले जात आहे. चिराग यांच्यासह लोजपचे सहा खासदार आहेत. मात्र, पारस यांच्यासह लोजपच्या पाच खासदारांनी चिराग यांच्याविरोधात बंड पुकारले. त्यांनी चिराग यांना हटवून लोकसभेतील पक्षनेतेपदी पारस यांची नियुक्ती केली. त्या नियुक्तीला बिर्ला यांनी मंजुरी दिली. त्या निर्णयाला आव्हान देत चिराग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली.
बंडानंतर पारस यांच्यासह पाच खासदारांची लोजपमधून हकालपट्टी करण्यात आली. त्यामुळे चिराग यांनाच पक्षाचे लोकसभेतील नेते म्हणून जाहीर करावे यासाठी बिर्ला यांना साकडे घालण्यात आले. मात्र, त्यांनी कथित चूक दुरूस्त केली नाही, अशी भूमिका चिराग यांनी याचिकेत मांडली होती.
पारस आणि चिराग या काका-पुतण्यांमध्ये पक्षाचा ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे. ते प्रकरण आता निवडणूक आयोगाकडे जाण्याची शक्यता आहे. पारस यांनी नुकतीच केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली. ती घडामोड चिराग यांच्यासाठी मोठा राजकीय हादरा ठरली आहे. आता न्यायालयाकडूनही त्यांना दिलासा मिळू शकलेला नाही.