जेएनयु प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाचे आदेश
नवी दिल्ली : जवाहरलाल नेहरु विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणाशी संबंधित माहिती व्हॉटस् ऍप आणि गुगलने जतन करावी, तसेच या हिंसाचाराच्या दिवशी निर्माण केलेल्या दोन व्हॉटस् ऍप ग्रुपमधील सदस्यांचे मोबाईल जप्त करावेत, असे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने मंगळवारी दिले.
पोलिसांना हवे असणारे सीसीटीव्ही फुटेज विद्यापीठ प्रशासनाने तातडीने उपलब्ध करून द्यावेत, असेही आदेश न्या ब्रिजेश सेठी यांनी मंगळवारी दिले. जेएनयुतील प्राध्यापक अमीत परमेश्वरन, अतूल सुद, आणि शुक्ल विनायक सावंत या प्राध्यापकांनी या प्रकरणात दाखल याचिकेवर हे आदेश न्यायालयाने दिले.
विद्यापीठाच्या तीन वस्तीगृह आणि आवारात पाच जानेवारीला बुरखेधारी गुंडांच्या टोळीने हल्ला चढवला होता. त्यात विद्यार्थी आणि प्राध्यापक मिळून 34 जण जखमी झाले होते. याबाबात वसंत कुंज पोलिस ठाण्यात तीन एफआयआर दाखल झाल्या आहेत.
या हल्ल्याशी संबंधीत दोन्ही व्हॉटस्ऍप ग्रुपच्या सदस्यांचे मोबाईल जप्त करावेत. या ग्रुपमधील सर्व सदस्यांना चौकशीसाठी समन्स बजवावे असे आदेशही न्यायालयाने दिले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्हॉटस् ऍप ग्रुपवरील 37 विद्यार्थ्यांची ओळख पोलिसांनी पटवली आहे. हे सर्व जण डाव्या अथव्या उजव्या विचारसरणीशी संबंधित नसल्याचे पोलिकसांकडून सांगण्यात येत आहे.