दिल्लीस्थित हरियाणवी गायिका आणि अभिनेत्री संगीता उर्फ दिव्या इंदोरा हिची हत्या करण्यात आली आहे. रोहतक जिल्ह्यातील मेहमजवळ पोलिसांना संगीताचा मृतदेह जमिनीत पुरलेला सापडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संगीता 11 मे पासून घरातून बाहेर पडली होती, मात्र त्यानंतर तिच्याबद्दल काहीच माहिती नव्हती. कुटुंबीयांनी 14 मे रोजी दिल्ली पोलिसांकडे अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.
पोलिसांच्या तपासात मेहमजवळील एका हॉटेलमध्ये संगीतासोबत जेवण करताना दिसलेल्या रोहित नावाच्या तरुणाचे नाव समोर आले आहे. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. एका अल्बमच्या शूटिंगसाठी रोहितने संगीताला तिच्या घरून भिवानी येथे आणले होते, असे सांगितले जात आहे. दुसरीकडे, तक्रार नोंदवूनही पोलिसांनी वेळीच कारवाई केली नसल्याचा आरोप संगीता यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. संगीतासोबत काम करणाऱ्या दोघांनी हत्या करून मृतदेह पुरल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. सध्या पोलिसांनी खून आणि अपहरणाच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून पुढील कार्यवाही सुरू केली आहे.