नवी दिल्ली: विलगीकरण कक्षामध्ये ठेवण्यात आलेल्या तबलिगी जमातच्या 2,446 सदस्यांची सुटका करण्याची सूचना दिल्ली सरकारने जिल्हा दंडाधिकाऱ्यांना केली आहे. सुटका केल्यानंतर हे तबलिगी घराव्यतिरिक्त अन्यत्र कोठेही जाणार नाहीत, याची काळजी घेण्याची सूचना दिल्ली सरकारने केली आहे.
या सूचनेनुसार या तबलिगींच्या सुटकेबाबतची शक्यता जिल्हा दंडाधिकाऱ्यांकडून पडताळून पाहण्यात येणार आहेत. हे सर्व तबलिगी वेगवेगळ्या राज्यातील आहेत. त्यांना त्यांच्या राज्यांमध्ये नेऊन सोडण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग राखून आनि अन्य निकष पाळून बसची उपलब्धता करून देण्याची शक्यताही पडताळली जाणार आहे, असे डीडीएमए विशेष सीईओ के.एस. मीना यांनी उपायुक्तांना पाठवलेल्या पत्रात सांगितले.
दिल्लीतील निजामुद्दीन भागात मार्चमध्ये झालेल्या धार्मिक समारंभात 567 विदेशी तबलिगीही सहभागी झाले होते. त्यांना पोलिसांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे, असेही मीना यांनी सांगितले. त्यांच्याविरोधात व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन करण्याच्या आरोपाखाली कारवाई केली जाणार आहे.
ज्या तबलिगींनी क्वारंटाईनचा कालावधी पूर्ण केला आहे आणि ज्यांची कोविड-19 ची चाचणी निगेटिव्ह आली आहे, त्यांची सुटका करण्यात यावी, असे आदेश दिल्लीचे गृहमंत्री सत्येंद्र जैन यांनी अलिकडेच दिले होते. त्यानुसार दिल्लीतील सदस्यांची सुटका केली जाईल. या सदस्यांना मशिदींसह अन्यत्र कोठेही राहण्याची परवानगी दिली जाईल. तर अन्य राज्यातील तबलिगी आपापल्या राज्यात पोहोचतील, याची काळजी संबंधित नोडल ऑफिसर आणि परिसराच्या पोलीस उपायुक्तांनी घ्यायची आहे, असेही मीना यांनी सांगितले.