धुक्यामुळे जनजीवन विस्कळित :रेल्वेसेवाही ठप्प
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीसह संपुर्ण उत्तर भारतात सध्या थंडीची लाट पसरली आहे. त्यातच दिल्लीत आज सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. आज पहाटे रेकॉर्डब्रेक 2.4 डिग्री सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. दिल्लीत यंदा सलग 14 दिवसांपासून सातत्याने तापमानात घट होत असून आजतर थंडीने कहर केला आहे. पुढील तीन दिवस थंडीचा प्रकोप कायम राहू शकतो असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. दरम्यान, थंडी आणि धुक्यामुळे दिल्लीतील जनजीवन विस्कळित झाले आहे तसेच रेल्वेसेवादेखील ठप्प झाली आहे.
दिल्लीच्या तापमानात सध्या मोठ्या प्रमाणावर घट झाली असून आजवरच्या इतिहासात थंडीने एवढी कमी तापमानाची नोंद केली नव्हती. दरम्यान, काल शुक्रवारी दिल्लीत या मोसमातील सर्वाधिक थंडी होती. यावेळी सफदरजंग आणि पालम येथील किमान तापमान केवळ 4.2 डिग्री सेल्सिअस इतके होते. तर आया नगर येथील किमान तापमान 3.5 डिग्री इतके नोंदवले गेले होते. त्यानंतर आज पहाटे 6 वाजून 10 मिनिटांनी शहरात 2.4 डिग्री सेल्सिअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, दिल्लीमध्ये डिसेंबर 1997 मध्ये सलग 13 दिवस थंडीची लाट पसरली होती. डिसेंबरमध्ये एकूण 17 दिवस थंडीचा कहर जाणवला होता. यावेळी आजवर 14 दिवस थंडीचा प्रकोप कायम आहे. स्कायमेटच्या अनुमानानुसार, 31 डिसेंबर, 1 आणि 2 जानेवारी रोजी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर उत्तर भारतातील डोंगराळ भागांमध्ये 3 जानेवारीला बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नंतर पुन्हा थंडीचा कडाका वाढू शकतो.
दरम्यान, पुढील पाच दिवसांचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून पुढील काही दिवसांमध्ये कमाल सरासरी तापमान 19.15 असु शकते आणि जर असे झाले तर 1901 नंतरचा हा दुसरा सर्वात थंड डिसेंबर असणार आहे. त्यानंतर 1997, 1998 2003 आणि 2014 मध्येही हिवाळ्यात अशी थंडीची लाट पसरली होती.