नवी दिल्ली – नवी दिल्लीतील लोधी रोडवरील केंद्रीय अन्वेषण विभागाच्या अर्थात सीबीआयच्या मुख्यालयात गुरुवारी सकाळी भीषण आग लागली. पार्किंग एरियाच्या इलेक्ट्रॉनिक खोलीत ही आग लागली. आगीनंतर धूर वाढत असल्याचे पाहून सर्व अधिकारी तत्काळ इमारतीतून बाहेर आले. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आणि आग आटोक्यात आणली.
आग कशामुळे लागली याबद्दल माहिती मिळाली नाही. शॉर्टसर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या आगीत कुठलीही जीवितहानी किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची माहिती अद्याप मिळाली नाही. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील ट्रान्सफॉर्मर आणि वातानुकूलन प्लांटच्या खोल्यांमध्ये ही आग लागल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.