नवी दिल्ली – देशाची राजधानी दिल्लीत कोरोनाचा कहर झपाट्यानं वाढत आहे. दिवाळीनंतर तर कोरोना संसर्ग झपाट्यानं वाढत आहे. दिल्लीमध्ये दररोज जेवढ्या चाचण्या होत आहेत त्यापैकी 10 टक्के चाचण्या पॉझिटिव्ह येत आहेत. दिल्लीत अनेक मान्यवरांनाही कोरोनाची लागण झाली आहे. आता दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांचा कोरोना अहवाल देखील पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी स्वत: ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे.
गोपाल राय यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “सुरूवातीला काही लक्षणे दिसल्यानंतर माझी कोरोना चाचणी करण्यात आली, त्याचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घ्यावी आणि कोरोना चाचणी करून घ्यावी,’ असे आवाहन देखील गोपाल राय यांनी ट्विटमध्ये केले आहे.
शुरुआती लक्षणों के बाद कोरोना टेस्ट कराया था जिसकी रिपोर्ट पॉजिटिव आई है। पिछले कुछ दिनों में जो लोग भी मेरे संर्पक में आए हैं कृपया वो अपना ध्यान रखें और टेस्ट करवा लें।
— Gopal Rai (@AapKaGopalRai) November 26, 2020
गोपाल राय यांना मॅक्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, याआधी दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि शिक्षणमंत्री मनीष सिसोदिया , आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. यासह आपचे आमदार आतिशी मार्लेना व इतर अनेक आमदार व नेते यांनाही कोरोनाची लागण झाली आहे, सध्या सर्वजण आता स्वस्थ आहेत.