Delhi Election Results 2025: दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निकालांची मतमोजणी सुरू आहे. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजप आघाडीवर असल्याचे पाहायला मिळत आहे. कलांमध्ये भाजपने बहुमताचा आकडा देखील गाठला आहे. तर दुसरीकडे ‘आप’चे अनेक दिग्गज नेते पिछाडीवर आहेत.
आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, दिल्लीच्या मुख्यमंत्री अतिशी या देखील पिछाडीवर आहेत. सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपने 70 पैकी जवळपास 45 जागांवर आघाडी घेतली आहे. तर आप 25 जागांवर आघाडीवर आहे. त्यामुळे भाजप 27 वर्षानंतर दिल्लीत सत्तेत परतण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचा विधानसभा निवडणुकीत विजय झाल्यास मुख्यमंत्रीपदाचे दावेदार कोण असतील, याची चर्चा सुरू झाली आहे.
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या अनेक नेत्यांच्या नावांची सध्या चर्चा आहे. भाजप विजयी झाल्यास मुख्यमंत्री कोण असेल? याबाबत विचारले असता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले की, ‘आतापर्यंतचे निकाल आमच्या अपेक्षांनुसार आहेत, पण आम्ही अंतिम निकालाची प्रतीक्षा करू. दिल्लीचा पुढील मुख्यमंत्री भाजपाचा असेल, पण यावर अंतिम निर्णय केंद्रीय नेतृत्व घेईल.
मुख्यमंत्रीपदासाठी भाजपच्या ‘या’ नेत्यांचे नाव चर्चेत
दिल्लीमध्ये भाजपचा विजय झाल्यास प्रवेश वर्मा, दुष्यंत गौतम आणि विजेंदर गुप्ता या नेत्यांना मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी मिळू शकते. सध्या प्रवेश वर्मा हे नवीन दिल्लीमधून अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध मैदानात आहेत. ते निवडणूक जिंकल्यास भाजपकडे त्यांच्या नावाचा मुख्यमंत्रीपदासाठी विचार केला जाऊ शकते. त्यांचे वडील साहिब सिंग वर्मा हेही दिल्लीचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
दुष्यंत गौतम यांचे नाव देखील मुख्यमंत्रीपदासाठी आघाडीवर आहे. ते भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस आहेत. तसेच, ते राज्यसभेत खासदार देखील राहिलेले आहेत. याशिवाय, विजेंदर गुप्ता यांच्या नावाची देखील चर्चा आहे. मागील विधानसभा निवडणुकीत आपला प्रचंड बहुमत मिळाले होते. त्याही वेळी गुप्ता विजयी झाले होते. त्यांनी विधानसभेत विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी देखील सांभाळली आहे.