Delhi Election Result । दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या एकूण 70 जागांच्या निकालासाठी आज मतमोजणी सुरू आहे. सुरुवातींच्या कलामध्ये भाजपने मोठी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले आहे. तर ‘आप’ अनेक मतदारसंघात पिछाडीवर आहे. आपचे प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल देखील पिछाडीवर आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीतील सुरुवातीच्या कलांमध्ये आम आदमी पक्षासाठी वाईट बातमी समोर येत आहे. अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि मुख्यमंत्री आतिशी हे आपचे प्रमुख नेते सुरुवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत.
अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. त्यांच्या विरोधात माजी मुख्यमंत्री साहिब सिंह वर्मा यांचा पुत्र आणि भाजपचे उमेदवार प्रवेश वर्मा हे उभे आहेत. पहिल्या कलांमध्ये प्रवेश वर्मा हे आघाडीवर आहेत. तर काँग्रेसच्या तिकिटावर उभे असलेले माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित तिसऱ्या स्थानावर आहेत.
दुसरीकडे, आम आदमी पक्षाचा दुसरे सर्वात मोठे चेहरा आणि दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया जंगपुरा मतदारसंघातून पिछाडीवर आहेत. जंगपुरा मध्ये त्यांच्यासमोरील भाजप उमेदवार तरविंदर सिंह मारवाह पुढे आहेत.
दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी कालकाजी विधानसभा मतदारसंघातून मागे आहेत. तर भाजप खासदार माजी खासदार रमेश बिधुडी आघाडीवर आहेत. या सीटवर माजी खासदार रमेश बिधूडी पुढे आहेत, तर काँग्रेसकडून उभ्या असलेल्या अलका लांबा सध्या तिसऱ्या स्थानावर आहेत.
दरम्यान, सुरुवातीच्या कलांमध्ये दिल्लीतील 70 पैकी जवळपास 45 जागांवर भाजपने आघाडी घेतली आहे. तर आपने 24 जागांवर पुढे आहे. तर काँग्रेस केवळ एका जागेवर पुढे आहे.