नवी दिल्ली : ८ फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर करण्यात आले. बहुतेक मतदानोत्तर सर्वेक्षणांमधून आम आदमी पक्षाला बहुमत मिळेल असा व्यक्त करण्यात आलेला अंदाज आजच्या निकालांमुळे योग्य ठरला आहे. सत्ताधारी आम आदमी पक्षाला ७० जागा असलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकांमध्ये जवळपास ६० जागा मिळाल्याने दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी सलग तिसऱ्यांदा अरविंद केजरीवाल विराजमान होणार आहेत.
दरम्यान, आजच्या दिल्ली विधानसभा निवडणुकांचे निकाल हे काही अंशी राजस्थान व मध्यप्रदेशच्या निकालांशी साम्य दर्शविणारे आहेत. लोकसभा निवडणुकांपूर्वी पार पडलेल्या राजस्थान व मध्यप्रदेश विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसने या दोन्ही राज्यांमध्ये सत्तेवर असलेल्या भाजपला पराभवाचा धक्का दिला होता. मात्र विधानसभा निवडुणकांमध्ये मिळालेले यश लोकसभा निवडणुकांमध्ये अबाधित राखण्यात काँग्रेस सपशेल अपयशी ठरली होती. दोन्ही राज्यांमध्ये विधानसभेतील सत्ता गमावल्यानंतर देखील भाजपने २०१९ लोकसभा निवडणुकांमध्ये राजस्थानात २५ पैकी २४ जागांवर तर मध्यप्रदेशात २९ पैकी २८ जागांवर विजय मिळवला होता.
दिल्ली विधानसभा व लोकसभा निवडणुकांचे निकाल तपासल्यास दिल्लीकरांनी राजस्थान व मध्यप्रदेश ‘पॅटर्न’ची पुनरावृत्ती केल्याचं पाहायला मिळतं. गतवर्षी पार पडलेल्या दिल्ली लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीकरांनी आम आदमी पक्षाला सपशेल नाकारत दिल्लीतील लोकसभेच्या सातही जागा भारतीय जनता पक्षाच्या पारड्यात टाकल्या होत्या.
साहजिकच लोकसभेतील यशाने भाजपचा आत्मविश्वास दुणावला होता मात्र लोकसभा निवडणुकांना अवघं एक वर्ष देखील उलटलं नसताना दिल्लीकरांनी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला सपशेल नाकारल्याचं आजच्या निकालांमधून स्पष्ट झालंय. यानिमित्तानं देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाला पसंती देणारा मतदार राज्यात मात्र भाजपला नाकारत असल्याचं पुन्हा एकदा पाहायला मिळालं.