Delhi Election 2025 – देशाची राजधानी दिल्लीत उद्या (बुधवार) विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होईल. त्यामुळे दिल्लीकर त्यांचा कौल देण्यासाठी सज्ज झाले आहेत. दिल्लीत कोण बाजी मारणार ते 8 फेब्रुवारीच्या निकालातून स्पष्ट होईल.
दिल्लीत विधानसभेच्या एकूण 70 जागा आहेत. त्या जागा जिंकून आमदार बनण्यासाठी एकूण 699 उमेदवार नशीब आजमावत आहेत. त्यांचे भवितव्य सुमारे 1.56 कोटी मतदार ठरवतील. दिल्लीत अनेक राजकीय पक्षांची आणि अपक्ष उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
अर्थात, खरी लढत आप, भाजप आणि कॉंग्रेस या प्रमुख पक्षांमध्येच आहे. सलग दोन कार्यकाळांपासून आप दिल्लीत सत्तेवर आहे. त्यामुळे आप सरकारच्या कामगिरीविषयीचे जनमत निवडणुकीच्या माध्यमातून समजेल. त्याशिवाय, भाजप आणि कॉंग्रेसचे पुढील 5 वर्षांसाठी दिल्लीतील राजकीय भवितव्य काय असेल तेही स्पष्ट होईल.
सरकारने केलेली कामगिरी, दिल्लीकरांना खुष करणाऱ्या योजनांची अंमलबजावणी आदींच्या जोरावर सत्ता राखण्याचा विश्वास आपकडून व्यक्त केला जात आहे. भाजप तब्बल 2 तपांपासून दिल्लीच्या सत्तेपासून दूर आहे. मात्र, ती कसर यावेळी भरून काढण्यासाठी तो पक्ष पूर्ण ताकदीने मैदानात उतरला आहे.
कॉंग्रेसला मागील 2 विधानसभा निवडणुकांत एकही जागा जिंकता आली नाही. त्या नामुष्कीचा शिक्का पुसून चकित करणारी कामगिरी करून दाखवण्याचा चंग त्या पक्षाने बांधला आहे.
दिल्ली विधानसभा संख्याबळाच्या दृष्टीने छोटी आहे. मात्र, ती देशाच्या राजधानीचे प्रतिनिधित्व करत असल्याने संबंधित निवडणुकीला मोठे राजकीय महत्व प्राप्त झाले आहे. त्या निवडणूक निकालाचा प्रभाव आगामी काळातील राष्ट्रीय राजकारणावरही पडू शकतो.
एक्झिट पोलवर किती काळ बंदी राहणार?
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयानेही यासंदर्भात आदेश जारी केला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, ’22 जानेवारीच्या अधिसूचना क्रमांक 576/Exit/2025/SDR/Vol-1 कडे सर्वसामान्य जनतेचे, विशेषत: न्यूज ब्युरो, मीडिया हाऊस, रेडिओ आणि टेलिव्हिजन चॅनेल इत्यादींचे लक्ष वेधले आहे.
भारत निवडणूक आयोगाच्या 2025 मध्ये अशी तरतूद करण्यात आली आहे की, एक्झिट पोल, ओपिनियन पोल किंवा इतर कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे निकाल प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये किंवा इतर कोणत्याही पद्धतीने प्रकाशित करण्यावर बंदी असेल.
मतदानासाठी 13 हजार 766 मतदान केंद्रे :
दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यानुसार, दिल्लीत मतदानासाठी 13 हजार 766 मतदान केंद्रे तयार करण्यात आली आहेत. 83.76 लाख पुरुष, 72.36 महिला आणि 1267 तृतीय लिंग मतदार आहेत. दिव्यांगांसाठी 733 मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.