Delhi Election 2025: कालकाजी मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे (आप) उमेदवार आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्या विरोधात निवडणूक लढवणारे भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी अर्ज दाखल केला आहे. बिधुरी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीचा खुलासा केला आहे. त्यानुसार रमेश बिधुरी हे दिल्लीचे मुख्यमंत्री आतिशी यांच्यापेक्षा श्रीमंत आहेत. आतिशी यांनी कालच उमेदवारी अर्ज दाखल केला होता. आतिशी यांच्या नावावर एकूण 76,93,374 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
रमेश बिधुरी यांच्याकडे किती मालमत्ता आहे?
रमेश बिधुरी यांच्या प्रतिज्ञापत्रात त्यांच्याकडे 30 हजार रुपये रोख, तर पत्नी कमला यांच्याकडे 20 हजार रुपये रोख असल्याचे उघड झाले आहे. याशिवाय त्यांच्याकडे 2 कोटी 57 लाख 42 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर स्थावर मालमत्तेबाबत बोलायचे तर त्यांच्याकडे 12 कोटी 66 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. याशिवाय त्यांच्याकडे चार कार आहेत ज्यात दोन महिंद्रा स्कॉर्पिओ, एक ह्युंदाई क्रेटा आणि एक टोयोटा इनोव्हा आहे.
आतिशीकडे किती मालमत्ता आहे?
आतिशी यांच्याकडे ना कार आहे ना घर. त्यांच्या नावावर एकूण जंगम मालमत्ता 76,93,374 रुपये आहे. यामध्ये 30 हजार रुपये रोख आणि एक लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आहेत. उर्वरित 75 लाख रुपये बँक बचत खाती आणि एफडीमध्ये आहेत. त्याचबरोबर कालकाजी येथील उमेदवार अलका लांबा यांच्याकडे कार नाही, तर घर आहे.
अतिशी 2020 मध्ये होत्या करोडपती, पण..
आतिशी यांच्या प्रतिज्ञापत्रानुसार, 2023-24 मध्ये त्यांचे एकूण उत्पन्न 9,62,860 रुपये आणि 2022-23 मध्ये 4,72,680 रुपये होते. 2020 च्या विधानसभा निवडणुकीत कालकाजी मतदारसंघातून निवडणूक लढवताना त्यांनी प्रतिज्ञापत्रात एकूण 1,41,21,663 रुपयांची संपत्ती जाहीर केली होती. मात्र, नंतर त्यात पतीच्या मालमत्तेचाही समावेश करण्यात आला. यावेळी त्यांनी केवळ वैयक्तिक मालमत्तेचा तपशील दिला आहे.