Delhi Election 2025 – देशाची राजधानी दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी एकूण १ हजार ५२२ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यातील ४७७ अर्ज छाननीनंतर फेटाळण्यात आले. त्यामुळे १ हजार ४० उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्थात, उद्या (सोमवार) उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. त्यानंतर दिल्लीच्या राजकीय रणसंग्रामात नेमके किती उमेदवार नशीब आजमावणार ते स्पष्ट होऊ शकेल.
दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत १७ जानेवारीला समाप्त झाली. त्यानंतर शनिवारी अर्जांची छाननी करण्यात आली. दिल्लीत आप, भाजप आणि कॉंग्रेस या प्रमुख पक्षांमध्ये तिरंगी लढत अपेक्षित आहे. त्याशिवाय, लहान पक्ष आणि अपक्षही राजकीय ताकद आजमावण्यास सरसावले आहेत.
दिल्लीत ५ फेब्रुवारीला मतदान होईल. त्यानंतर ८ फेब्रुवारीला मतमोजणी केली जाईल. त्या निकालाकडे संपूर्ण देशाचे लक्ष असेल. आपने सत्ता राखण्याचा चंग बांधला आहे. तर, दिल्लीच्या सत्तेत २५ वर्षांनंतर कमबॅक करण्यासाठी भाजप ताकदीने मैदानात उतरला आहे. मागील २ निवडणुकांत खातेही उघडू न शकलेल्या कॉंग्रेसने चांगली कामगिरी करण्याच्या उद्देशातून मोचेर्बांधणी केली आहे.