नवी दिल्ली – भाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मित्रपक्षांसाठी २ जागा सोडल्या. त्यापैकी एकही जागा वाट्याला न आल्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष नाराज झाला. त्यातून त्या पक्षाने दिल्लीच्या रणसंग्रामात स्वतंत्रपणे उडी घेत ३० उमेदवार मैदानात उतरवले.
दिल्लीत विधानसभेच्या एकूण ७० जागा आहेत. त्यातील ६८ जागा भाजप लढवणार आहे. तर, जेडीयू आणि लोजप (रामविलास) या मित्रपक्षांसाठी प्रत्येकी १ जागा सोडण्यात आली आहे.
मात्र, भाजपचा महाराष्ट्रातील सहकारी असणाऱ्या अजित पवार पक्षाच्या वाट्याला एकही जागा आली नाही. त्यामुळे तो पक्ष नाराज झाल्याची माहिती सुत्रांकडून देण्यात आली. अजित पवार पक्षाने उमेदवारी दिलेल्यांपैकी १३ जण अल्पसंख्याक समुदायातील आहेत.
त्या पक्षाने आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या विरोधातही नवी दिल्लीत उमेदवार दिला. त्या मतदारसंघात अजित पवार पक्षाने विश्वनाथ आगरवाल यांना उमेदवारी दिली आहे. दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होईल.