दिल्लीमध्ये रक्षकच झाला भक्षक

पोलिस उपनिरिक्षकाने केला महिलांचा विनयभंग

नवी दिल्ली – सहसा पोलिसांची नियुक्ती ही सर्वसामान्य नागरिकांच्या रक्षणासाठी केलेली असते. तसेच गुन्हेगारांना सबळ पुराव्यासह न्यायलायसमोर सादर करुन न्यायालयाने दिलेल्या शिक्षेची अंमलबजावणीही त्यांनीच करायची असते. मात्र, वर्दीमध्ये असलेले उपनिरिक्षक पदावरचे अधिकारीच जर वर्दी असूनही गुन्हे करत असतील तर दाद कोणाकडे मागायची? अशीच अवस्था दिल्लीमधील अनेक महिलांची झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

दिल्लीच्या द्वारका परिसरामध्ये एका राखाडी रंगाच्या बॅलिनो कारमधून प्रवास करणाऱ्या इसमाने सकाळी 8 ते 9 या वेळेत अनेक महिलांचा विनयभंग केल्याचे उघड झाले. यासंदर्भात किमान चार महिलांनी द्वारका पोलिस स्टेशनमध्ये विनयंभग, दंडेलशाही आणि लैंगिक अत्याचारविषयक तसेच बालकांविरोधातील लैंगिक अत्याचारविषयक विविध कलमांखाली गुन्हे दाखल केले.

पोलिसांनी या चारहे तक्रारींची दखल घेत सुमारे 200 पोलिसांनी 200 सीसीटीव्हीमधील चित्रीकरण तपासले असता, एका राखाडी रंगाच्या बॅलिनोचा चालक गुन्हेगार असल्याचे दिसून आले. मग पोलिसांनी सुमारे 286 बॅलिनोंची तपासणी केली. मात्र, अखेरीस असे आढळून आले की, गुन्हा करणाऱ्या इसमाची कार कुठेही नोंदणीकृत झालेली कार नव्हतीच. अखेरीस असे आढळून आले की, विनानोंदणीकृत वाहतून महिलांची छेडछाड आणि विनयभंग करणारा इसम दुसरा-तिसरा कोणी नसून दिल्ली पश्‍चिम दिल्लीच्या जनकपूर भागामधील एक पोलिस सब इन्स्पेक्‍टर असून तो दिल्ली पोलिसांच्या सेवेत असून त्याचे नाव पुनीत ग्रेवाल असे आहे.

अधिक माहिती घेता असेही आढळून आले की, पुनीत ग्रेवालने असे अनेक गुन्हे केले असून, तो पोलिसातच असल्याने त्याच्या विरोधात कुणीही तक्रार अर्थात एफआयआर नोंदवण्यात आली नव्हती. मात्र, 17 ऑक्‍टोबरला एकापाठोपाठ चार तक्रारी दाखल झाल्याने पोलिसांनी ग्रेवालला अटक करुन विशेष न्यायालयीन कोठडीत ठेवले आहे. पुनित ग्रेवालने केलेल्या छेडछाडीबाबतचा एक व्हिडीओ एका सायकलपटू महिलेने समाजमाध्यमांत व्हायरल केल्यानंतर या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.