नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयने टाकलेल्या छाप्याच्या कारवाईचे कॉंग्रेसने स्वागत केले आहे. दिल्ली कॉंग्रसचे प्रमुख अनिल चौधरी म्हणाले की सीबीआयने आम आदमी पक्षाच्या भ्रष्ट मंत्र्यावर कारवाई केली आहे व अशी कारवाई करण्याची मागणी आम्ही अगोदरच केली होती.
दिल्ली सरकारच्या अबकारी नितीला आम्ही विरोध केला होता. त्यांनी दारू माफियांना संरक्षण दिले होते. त्यांच्याकडून लूट सुरू असताना भारतीय जनता पार्टीचे आमदारही गप्प होते. उशीराने का होईना पण सीबीआय आता या प्रकरणाचा तपास करते आहे याचा आम्हाला आनंद आहे.
आम आदमी पक्षाचे हे 71 आमदार प्रामाणिक नाहीत तर भ्रष्ट आहेत हेच या कारवाईवरून सिध्द होते. यातल्या 34 जणांवर तर अत्यंत गंभीर आरोप आहेत. आता जी कारवाई सुरू आहे ती पूर्ण झाल्यावर बहुतेक जण तुरूंगात जातील याची आपल्याला खात्री असल्याचे चौधरी यांनी म्हटले आहे.