नवी दिल्ली – देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान (दिल्ली सीएम हाऊस) सील करण्यात आले आहे. बेकायदेशीर वापराच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे. मुख्यमंत्रिपद सोडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपले सरकारी निवासस्थान रिकामे केले होते. मात्र, केजरीवाल यांनी मुख्यमंत्री निवासस्थानाचा गैवापर केल्याचा आरोप भाजपकडून सातत्याने करण्यात येत आहे. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
दिल्ली सरकारच्या पीडब्ल्यूडी विभागाचे पथक बुधवारी मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील करण्यासाठी दाखल झाले. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान सील करण्याचे कारण हस्तांतर प्रक्रियेचे पालन न केल्याने देण्यात आले आहे. या कारवाईनंतर आपचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी भाजपवरही गंभीर आरोप केला.
ते म्हणाले की, गेल्या काही दिवसांत भाजपने अनेक अफवा पसरवल्या आहेत. आपचे प्रमुख केजरीवाल हे तुरुगांत असतानाही पक्ष फोडण्याचा अनेकवेळा प्रयत्न झाला. दिल्लीतील विधानसभा निवडणुकीत भाजपला विजय मिळवता न आल्याने आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचा बंगला हडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. केजरीवाल यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर बंगला रिकामा केला होता. पण तो नवीन मुख्यमंत्री आतिशी यांना दिला जात नाही आणि मुख्यमंत्र्यांचे कॅम्प ऑफिसही रिकामे केले आहे, असा दावा सिंह यांनी केला.
याप्रकरणी दिल्ली भाजपचे अध्यक्ष वीरेंद्र सचदेवा म्हणाले, अरविंद केजरीवाल यांच्या पापाचे भांडे आधीच भरले आहे. तुमचा भ्रष्टाचारी महाल अखेर सील झाला आहे. या बंगल्यातील शीशमहल सेक्शनचा प्लान संमत करण्यात आला नव्हता. सरकारी प्रमाणपत्र न मिळालेल्या बंगल्यात तुम्ही येथे कसे राहात होता? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.
इतिहासात प्रथमच –
मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान रिकामे करण्यात आले. भाजपच्या सांगण्यावरून एलजीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीएम आतिशी यांचे सामान जबरदस्तीने बाहेर काढले. सीएमओ कार्यालयाने ही माहिती दिली आहे. सीएमओचा आरोप आहे की एलजीच्या वतीने सीएम निवास भाजपच्या एका मोठ्या नेत्याला देण्याची तयारी सुरू आहे. 27 वर्षांपासून दिल्लीत वनवास भोगत असलेल्या भाजपला आता मुख्यमंत्री निवासस्थान ताब्यात घ्यायचे आहे.