शारजा – नितीश राणा, इयान मॉर्गन आणि राहुल त्रिपाठी यांच्या आक्रमक फलंदाजीनंतरही कोलकाता नाईट रायडर्सला दिल्ली कॅपिटल्सकडून 18 धावांनी पराभव पत्करावा लागला. विजयासाठी 229 धावांचा पाठलाग करताना कोलकाताचा डाव 8 बाद 210 धावांवर रोखत दिल्लीने विजय मिळवला.
That’s that from Match 16 of #Dream11IPL as @DelhiCapitals win by 18 runs.#DCvKKR pic.twitter.com/JIyTe1zwdD
— IndianPremierLeague (@IPL) October 3, 2020
तत्पूर्वी, कर्णधार श्रेयस अय्यर व सलामीवीर आक्रमक फलंदाज पृथ्वी शॉ याने केलेल्या वादळी खेळीमुळे दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाईट रायडर्सविरुद्धच्या सामन्यात 4 गडी गमावून 228 धावांचा डोंगर उभा केला.
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकत दिल्लीला प्रथम फलंदाजी दिली. त्याचा हा निर्णय शॉ याने चुकीचा ठरवला.त्याने चौफेर टोलेबाजी करत मैदान दणाणून सोडले. शिखर धवन याही सामन्यात अपयशी ठरला. त्याने 16 चेंडूत 2 चौकार व 2 षटकार फटकावून 26 धावा केल्या. अर्थात त्याने पृथ्वीसह संघाला 56 धावांची सलामी दिली.
धवन परतल्यावर; मात्र पृथ्वीने कर्णधार श्रेयस अय्यर याला साथीला घेत संघाचा डाव सावरला. या जोडीने कोलकाताच्या गोलंदाजीचा पालापाचोळा केला. शॉ याने आपले अर्धशतक थाटात पूर्ण केले. त्यानंतरही त्याने आक्रमक फलंदाजी केली. मात्र, याच प्रयत्नात तो 66 धावांवर बाद झाला. त्याने 41 चेंडूत 4 चौकार व 4 षटकारांची आतषबाजी केली. त्याने अय्यरच्या साथीत दुसऱ्या गड्यासाठी 73 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली व संघाचे शतकही फलकावर लावले.
शॉ बाद झाल्यावर अय्यरने ऋषभ पंतसह पुन्हा एकदा डावाला आकार दिला. अय्यर याने पृथ्वीचाच कित्ता गिरवताना कोलकाताच्या गोलंदाजांवर वर्चस्व गाजवले. अय्यरनेही अर्धशतक झळकावले. पंतनेही आक्रमक फलंदाजी करताना 17 चेंडूत 5 चौकार व 1 षटकार फटकावून 38 धावांची खेळी केली. त्याने अय्यरच्या साथीत तिसऱ्या गड्यासाठी 72 धावांची भागीदारी केली.
तो बाद झाल्यावर आलेल्या मार्कस स्टोनिसने या सामन्यात निराशा केली. अय्यरने केवळ 38 चेंडूत 7 चौकार व तब्बल 6 षटकारांची फटकेबाजी करत नाबाद 88 धावांची खेळी केली व संघाला द्विशतकी धावांबरोबरच स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या उभारून दिली.
संक्षिप्त धावफलक –
दिल्ली कॅपिटल्स – 20 षटकांत 4 बाद 228 धावा. (पृथ्वी शॉ 66, शिखर धवन 26, ऋषभ पंत 38, श्रेयस अय्यर नाबाद 88, शेमरॉन हेटमायर नाबाद 7, आंद्रे रसेल 2-29). कोलकाता नाईट रायडर्स – 20 षटकांत 8 बाद 210 धावा. (नितीश राणा 58, इयान मॉर्गन 44, राहुल त्रिपाठी 36, अनरिच नोर्जे 3-33, हर्षल पटेल 2-34).