दिल्लीची सीमा आठवडाभर बंद

नवी दिल्ली  – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली राज्याची सीमा आठवडाभर पूर्ण बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. त्यांनी सांगितले की, ज्यांना सरकारने पासेस दिले आहेत त्यांनाच दिल्लीच्या सीमेत प्रवेश करू दिला जाईल तसेच जे लोक जीवनावश्‍यक सेवेशी संबंधित आहेत त्यांनाच येथे आत येऊ दिले जाणार आहे. केजरीवालांनी आता लॉकडाऊन व सीमा सील करण्याच्या निर्णयाच्या संबंधात लोकांकडून त्यांची मते मागवली आहेत. त्यासाठी त्यांनी त्यांचा व्हॉट्‌सऍप नंबरही दिला आहे. रविवारी उत्तर प्रदेशच्या प्रशासनाने दिल्ली- नोएडा सीमा बंद करण्याचा आदेश दिला आहे.

\\उत्तर प्रदेशच्या गौतमबुद्धनगरमध्ये गेल्या 20 दिवसांत करोनाच्या ज्या केसेस वाढलेल्या आढळून आल्या आहेत त्यापैकी 42 केसेस या दिल्लीहून आलेल्या नागरिकांच्या आहेत, असे त्यांचे म्हणणे आहे.
दिल्लीत आरोग्यविषयक सेवा चांगल्या आणि मोफत आहेत. त्याचा लाभ घेण्यासाठी शेजारील राज्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक दिल्लीत येऊ लागले तर दिल्लीच्या स्थानिक रहिवाशांनाच करोनाच्या काळात आरोग्य सेवा पुरवता येणार नाहीत, त्यामुळे दिल्लीच्या सीमा तात्पुत्या बंद कराव्या लागत आहेत, असे केजरीवालांनी म्हटले आहे.

दिल्लीत करोना पेशंटसाठी पुरेशा बेडस आणि रुग्ण सेवा उपलब्ध आहेत त्या विषयी नागरिकांनी चिंता करू नये, अशी ग्वाहीही केजरीवालांनी दिली. दरम्यान, केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या संबंधात ज्या सवलती जाहीर केल्या आहेत त्या सर्व सवलती दिल्लीतही लागू केल्या जात आहेत, अशी माहितीही त्यांनी दिली. दिल्लीत सलून आणि केशकर्तनालयेही सुरू करण्यास त्यांनी अनुमती दिली आहे. पण अजून स्पा सुरू करण्यास अनुमती देण्यात आलेली नाही. चारचाकी आणि दुचाकी गाड्यांवर बसणाऱ्या माणसांच्या संख्येवरील निर्बंधही केजरीवाल सरकारने काढून टाकले आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.