नवी दिल्ली – इस्रायली दुतावासाजवळ शुक्रवारी झालेल्या बॉम्बस्फोटाचा दिल्लीत 2012 मध्ये राजनैतिक अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्याशी संबंध असू शकतो, अशी शक्यता इस्रायलचे राजदूत रॉन माल्का यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, याबाबतचा तपास सुरू आहे. भारताने हमी देत सर्व पाठींबा, संरक्षण आणि सहाय्य देण्याचे मान्य केले आहे.
दिल्लीत 2012मध्ये राजनैतिक अधिकाऱ्यांवर झालेला हल्ला दुतावासापासून फार लांब झाला नव्हता. त्याचा संबंध असू शकतो. आम्ही तपास करत आहोत. मात्र, त्याचे स्वरूप पाहता ही एक शक्यता नाकारता येत नाही, असे माल्का यांनी स्पष्ट केले.
इस्रायली दुतावासाबाहेर शुक्रवारी झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला असू शकतो. सध्या तरी झालेला बॉम्बस्फोट हा दहशतवादी हल्ला आहे, अशी आमची तीव्र धारणा आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. भारतीय प्रशासनावर पूर्ण विश्वास दाखवून मल्का म्हणाले, भारत आणि इस्रायली प्रशासनात उत्तम संबंध आहेत.
परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी इस्रायली परराष्ट्र मंत्री गबी अशकेनाझी यांना दूरध्वनी केला. त्यांनी इस्रायली राजनैतिक अधिकाऱ्यांना संपूर्ण संरक्षण देण्याचे आश्वासन दिले. परराष्ट्र सचिव हर्षवर्धन यांनी इस्रायली अधिकाऱ्यांना दूरध्वनी करून परिस्थितीची कल्पना दिली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हल यांनी त्या देशाच्या सुरक्षा सल्लागारांशी चर्चा केली. त्यांनी याच्या तपासात पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिल्याचे जयशंकर यांनी सांगितले.
स्फोटाजवळ पाकिट
स्फोट घडला त्याठिकाणी इस्रायली राजनैतिक अधिकाऱ्यांशी संबंधित पाकिट सापडले आहे. त्याचा या प्रकरणाशी काही संबंध आहे का? हे तपास यंत्रणा पडताळून पाहतील. मात्र ते घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आले आहे, असे एक ज्येष्ठ सरकारी अधिकाऱ्याने सांगितले.