IPL 2021 : धवन-शॉचा तडखा; दिल्लीचा चेन्नईवर 7 गडी राखून शानदार विजय

IPL 2021 – सलामीवीर शिखर धवन आणि मुंबईकर पृथ्वी शॉ यांच्या शानदार अर्धशतकांच्या जोरावर दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेच्या तिसऱ्या सामन्यात चेन्नई सुपरकिंग्सला ७ गडी राखून मात दिली. प्रथम फलंदाजीला आलेल्या चेन्नई संघाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १८८ धावांचा डोंगर उभारला. प्रत्युत्तर फलंदाजीला आलेल्या दिल्लीने केवळ १८.४ षटकांत ३ बाद १९०  धावा करून विजयाची निश्चिती केली. शिखऱ धवनने सर्वाधिक ८५ धावा केल्या.

विजयासाठी १८९ धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सने आक्रमक सुरुवात केली. फॉर्मात असलेल्या शिखर धवन आणि पृथ्वी शॉ जोडीने १३.३ षटकांत १३८ धावांची सलामी दिली. शॉने ३८ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ७२ धावा केल्या. त्याला ड्वेन ब्राव्होने बाद केले. तर धवनने ५४ चेंडूत १० चौकार आणि दोन षटकारांसह ८५ धावा केल्या. शार्दूल ठाकूने धवनला तंबूत धाडले. त्यानंतर आलेल्या ऋषभ पंत (नाबाद १५ ) आणि मार्कस स्टॉईनिस (१४) यांनी दिल्लीच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

नाणेफेक गमावून फलंदाजीला आलेल्या चेन्नईची सुरुवात खराब झाली. सलामीवीर ऋतुराज गायकवाड (५) आणि फाफ डुप्लेसिस (०) झटपट बाद झाले. मात्र मोईन अली (३६) आणि सुरेश रैना यांनी चेन्नईचा डाव सावरला. मोईन अली बाद झाल्यानंतर आलेल्या अंबाती रायुडूने २३ धावांची भर टाकत रैनाला साथ दिली. रैनाने शानदार अर्धशतक पूर्ण करत ५४ धावा केल्या. रैना आणि रायुडू बाद झाल्यानंतर रवींद्र जडेजाने नाबाद २६ तर सॅम करनने  नाबाद ३४ धावा कुटल्या. तर धोनी शुन्यावर बाद झाला. दिल्लीकडून ख्रिस वोक्स आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर रवीचंद्रन अश्विन आणि टॉम करनने प्रत्येकी एक गडी बाद केला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.