नवी दिल्ली: दिल्ली विधानसभा निकालाचे कल हाथी यायला सुरूवात झाली आहे. दिल्लीत २७ वर्षांनंतर भाजपची सत्ता येणार असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र, निवडणुकीचे अंतिम कल हाती आल्यानंतर येथील चित्र स्पष्ट होईल. या निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव होत असल्याचे दिसत आहे. यावर निवडणुकीच्या अनुषंगाने अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत. महाविकास आघाडीतील नेते संजय राऊत यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीविषयीची प्रतिक्रिया दिली आहे. दिल्लीतही ‘महाराष्ट्र पॅटर्न’ लागू करण्यात आल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.
पाच वर्ष केजरीवाल यांना काम करू दिले नाही. नायब राज्यपालांच्या हातात ताकद दिली. सर्व प्रमुख नेत्यांना तुरुंगात टाकले. त्याचा हा परिणाम आहे. तुम्ही सर्वांना आत टाकाल आणि निवडणुका जिंकाल. हा फॉर्म्युला महाराष्ट्रात झाला. दिल्लीत झाला आता बिहारमध्ये दिसत असल्याचा आरोप राऊत यांनी केला. काँग्रेस आणि आपचं मनोमिलन झाले असते तर ही परिस्थिती आली नसती, असा खोचक टोलाही राऊत यांनी काँग्रेसला लगावला. आप आणि काँग्रेस यांचे स्पर्धक भाजप असल्याचे राऊत म्हणाले.
एकनाथ शिंदेंकडे अघोरी विद्याः राऊत
फडणवीस यांनी महाराष्ट्राचा विचार करा. ते अजून राष्ट्रीय नेते झाले नाहीत. राहुल गांधी राष्ट्रीय नेते आहेत. तुम्ही बोगस मतदान करून जिंकले म्हणून नेता झाले. महाराष्ट्रात 39 लाख मतदार वाढले आणि सर्वच मते भाजपलाच कशी मिळाली?. ही कोणती जादू आहे? हे कोणते अघोरी कृत्य आहे? हे फडणवीस यांनी सांगावे, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. एकनाथ शिंदेंकडे अघोरी विद्या आहे, जादूटोणा आहे. त्यांना विचारा. बोगस मतदान करता आणि आम्हाला ज्ञान देता, अशा खमक्या शब्दांत राऊतांनी फडणवीस यांना सुनावले.