Delhi Assembly elections – महाराष्ट्रात मिळविलेल्या घवघवीत यशानंतर भाजपने आता आपला फोकस दिल्ली विधानसभा निवडणुकीवर केंद्रीत केला आहे. मागील निवडणुकीत ज्या मतदारसंघात भाजपच्या उमदेवारांचा पराभव झाला होता अशा मतदान केंद्रावर जास्त मेहनत घेतली जात आहे. विशेषत: अनुसूचित जातीसाठी राखीव 12 मतदारसंघातील लोकांना भाजपकडे वळविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीची घटका जवळ येत आहे. दिल्लीची लढत तिरंगी होणार असली तरी मुख्य मुकाबला सत्ताधारी आम आदमी पक्ष आणि भाजपमध्ये आहे. यामुळे दोन्ही पक्षांनी तयारी सुरू केली आहे. दिल्लीत 12 जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. या मतदारसंघातील मतदार आणि अनुसूचित जातीतील लोकांचा पाठिंबा मिळविण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. कारण, मागच्या दोन निवडणुकांमध्ये पक्षाची कामगिरी फार वाईट होती. यामुळे भाजपची चिंता थोडी वाढली आहे. दिल्लीची सत्ता मिळवायची असेल तर या लोकांचे समर्थन मिळणे आवश्यक आहे, याची जाणीव मुख्य विरोधी पक्षाला बऱ्यापैकी झाली आहे.
ही बाब लक्षात घेऊनच भाजपने पुढची रणनीती आखली आहे. अनुसूचित जाती आघाडीचे कार्यकर्ते गेल्या चार महिन्यांपासून जनसंपर्क मोहीम राबवत आहेत. कुठलीही कमतरता भासू नये यासाठी इतर राज्यातील अनुसूचित जातीच्या नेत्यांना वेगवेगळ्या विधानसभांची जबाबदारी देण्यात आली आहे.2014 आणि 2019 मधील लोकसभेच्या निवडणुकीत या भागात भाजपने चांगले प्रदर्शन केले होते. पंरतु, विधानसभेच्या दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला पराभवाचे तोंड बघावे लागले होते. दोन्ही निवडणुकांमध्ये भाजपला एकही आरक्षित जागा जिंकता आली नव्हती.
मात्र या निवडणुकीत जुन्या पराभवाची पुनरावृत्ती होणार नाही, अशी भाजपला आशा आहे. आप आणि काँग्रेसने एकत्र निवडणूक लढविली होती. तरीुसध्दा भाजपला नऊ राखीव विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली होती. यामुळे भाजपचा आत्मविश्वास बळावला आहे.दिल्लीच्या जनतेचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास वाढला आहे. हा विश्वास आणखी बळकट करण्यासाठी भाजपने आता रणनिती आखली आहे. भाजपने 30 अशा मतदारसंघाची यादी तयार केली आहे जेथे अनुसूचित जातीतील मतदारांची संख्या ३० टक्क्यांहून जास्त आहे. या भागात ऑगस्टपासून काम सुरू झाले आहे.
या भागातील प्रत्येक बूथवर 10 कार्यकर्त्यांची टीम तयार करण्यात आली आहे. आता या जागांवर हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, पंजाब, बंगाल, झारखंडमधून अनुसूचित जातीतून येणारे खासदार, आमदार, माजी मंत्री आणि राज्य अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. निवडणुकीपर्यंत ते इथेच राहणार आहेत. लोकसभा निवडणुकीत भाजपला कोंडली, त्रिलोकपुरी, की गोकलपुरी, देवळी, माडीपूर, पटेल से नगर, करोल बाग, मंगोलपुरी, बवाना राख आणि नांगलोई जाट विधानसभा मतदारसंघात भाजपला चांगले मतदान झाले होते. तर सीमापुरी, आंबेडकर नगर, या विधानसभा मतदारसंघात घट झाली होती.