Delhi Assembly Elections । दिल्लीतील विधानसभा निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे, तर मतमोजणी ८ फेब्रुवारी २०२५ रोजी होईल. काँग्रेस, भाजप, आम आदमी पार्टी या तिन्ही प्रमुख पक्षांनी दिल्लीतील सर्व ७० जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यासोबतच त्यांचे जाहीरनामे देखील प्रसिद्ध केले आहेत. दिल्लीच्या ७० जागांपैकी एक असलेली तिमारपूर जागा खूप मनोरंजक आहे. कारण ही विधानसभा जागा जिंकणारा पक्ष सरकार स्थापन करतो. असा आजपर्यंतचा इतिहास आहे. नेमकं असं का होत ? या तिमारपूर मतदारसंघाचा राजकीय इतिहास काय आहे ? हे जाणून घेऊया.
मध्य दिल्ली ही राजधानी दिल्लीतील ११ जिल्ह्यांपैकी एक आहे आणि तिच्या अंतर्गत ७ विधानसभा जागा आहेत, ज्यामध्ये तिमारपूर जागा देखील समाविष्ट आहे. तिमारपूर जागा ईशान्य दिल्ली लोकसभा मतदारसंघात येते. याठिकाणचे विद्यमान आमदार आम आदमी पक्षाचे दिलीप पांडे आहेत. भाजपला या जागेवर फक्त एकदाच विजयाची चव चाखण्याची संधी मिळाली आहे. यानंतर पक्षाला याठिकाणी कधीही पुनरागमन करता आले नाही. तिमारपूरची जागा काँग्रेसने तीन वेळा आणि गेल्या तीन वेळा आम आदमी पक्षाने जिंकली आहे.
यावेळी तिमारपूरमध्ये कोण कोण निवडणूक रिंगणात आहेत? Delhi Assembly Elections ।
यावेळीच्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर, निवडणुकीपूर्वी भाजपमधून पक्षात सामील झालेले सुरिंदर पाल सिंग बिट्टू यांना ‘आप’ने उमेदवार बनवले आहे. ते पूर्वी काँग्रेसमध्ये होते आणि २००३ आणि २००८ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर तिमारपूरमधून आमदारही राहिले आहेत. भाजपने सूर्यप्रकाश खत्री यांना उमेदवारी दिली आहे. तर, काँग्रेसने लोकेंद्र चौधरी यांना तिकीट दिले आहे.
१९९३ च्या निवडणुकीपासून भाजपला तिमारपूरची जागा जिंकता आलेली नाही.
आता गेल्या काही निवडणुकांबद्दल बोलूया, १९९३ च्या निवडणुकीत भाजपचे राजेंद्र गुप्ता यांनी येथे भाजपला विजय मिळवून दिला होता, तेव्हापासून भाजपला ही जागा जिंकता आलेली नाही. १९९३ च्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने ४९ जागा जिंकून सरकार स्थापन केले. भाजपच्या विजयानंतर मदनलाल खुराणा दिल्लीचे मुख्यमंत्री झाले.
१९९८ ते २००८ पर्यंत दिल्लीत काँग्रेसचे सरकार Delhi Assembly Elections ।
१९९८ ते २००८ पर्यंत दिल्लीत काँग्रेसचे पूर्ण बहुमताचे सरकार होते. त्याच वेळी तिमारपूर मतदारसंघातून काँग्रेसचे जगदीश आनंद विजयी झाले होते. १९९८ च्या निवडणुकीत काँग्रेसने ५२ जागा जिंकून भाजपला सत्तेवरून हाकलून लावले. भाजपला फक्त १७ जागांवर समाधान मानावे लागले होते. तर त्यावेळी शीला दीक्षित दिल्लीच्या मुख्यमंत्री झाल्या. २००३ च्या निवडणुकीत काँग्रेसने ४७ जागा जिंकल्या आणि शीला दीक्षित सलग दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाल्या. २००८ मध्ये काँग्रेसने ४३ जागा जिंकून सत्ता कायम ठेवली. २००३ आणि २००८ च्या निवडणुकीत काँग्रेसचे सुरिंदर पाल सिंग बिट्टू यांनी ही जागा जिंकली होती.
२०१३ च्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’चा प्रवेश
आता २०१३ च्या निवडणुकीबद्दल बोलायचे झाले तर याठिकाणी आपचे हरीश खन्ना तिमारपूर मतदारसंघातून निवडणूक जिंकले होते. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली आम आदमी पक्षाने पहिल्यांदाच निवडणूक लढवली आणि २८ जागा जिंकल्या. भाजप ३१ जागा मिळवून सर्वात मोठा पक्ष होता पण पक्षाला बहुमत मिळू शकले नाही. काँग्रेसला फक्त आठ जागाचा मिळवता आल्या. या परिस्थितीत, ‘आप’ने काँग्रेसच्या पाठिंब्याने सरकार स्थापन केले आणि अरविंद केजरीवाल पहिल्यांदाच दिल्लीचे मुख्यमंत्री बनले परंतु हे सरकार फक्त ४९ दिवस टिकले. २०१३ च्या विधानसभा निवडणुकीत जनता दल युनायटेड, शिरोमणी अकाली दल आणि अपक्षांनी प्रत्येकी एक जागा जिंकली होती.
२०१५ च्या निवडणुकीत ‘आप’ने ७० पैकी ६७ जागा जिंकून ऐतिहासिक कामगिरी केली होती. त्याच वेळी, जर आपण तिमारपूर जागेबद्दल बोललो तर येथून आपचे पंकज पुष्कर विजयी झाले होते. भाजपला फक्त तीन जागा मिळाल्या तर काँग्रेसला खातेही उघडता आले नाही. त्याचप्रमाणे २०२० मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत ‘आप’ने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले. पक्षाने ६२ जागा जिंकून भाजप आणि काँग्रेसचा पराभव केला. भाजपला फक्त आठ जागा मिळाल्या, तर काँग्रेसला एकही जागा मिळाली नाही. तर, तिमारपूर मतदारसंघातून आपचे दिलीप पांडे विजयी झाले होते.
दरम्यान , या तिमापूरचा इतिहास पाहता आणि याठिकाणी यंदा निवडणुकीसाठी उभे राहणारे प्रत्येक पक्षाचे नेते तेवढेच ताकदीचे असल्याचे दिसून येत आहेत. मात्र कोण कितीही ताकदीचा असला तरी शेवटी जनताच कोणाला निवडून द्यायचे ठरवत असते . त्यामुळे यंदाही या मतदारसंघात काही ऐतिहासिक घडणार का हे येत्या ८ तारखेला समजणार आहे.