Delhi Assembly Election Result 2025 – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या (शनिवार) जाहीर होईल. आपला सलग चौथा कार्यकाळ मिळणार की भाजप २७ वर्षांच्या खंडानंतर सत्तेत कमबॅक करणार की सर्वांना चकवून कॉंग्रेस राजकीय चमत्कार घडवणार, या प्रश्नाचे उत्तर निकालातून मिळेल. दिल्ली कुणाची याविषयीचा फैसला देशाच्या राजकारणावर प्रभाव टाकणार आहे. साहजिकच, राजकीयदृष्ट्या त्या निकालाला अतिशय महत्व प्राप्त झाले आहे.
देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी ६०.५४ टक्के इतके मतदान झाले. त्यामुळे विधानसभेच्या एकूण ७० जागांसाठी निवडणूक मैदानात उतरलेल्या एकूण ६९९ उमेदवारांचे भवितव्य इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये (इव्हीएम) बंद झाले. आता निकालामुळे दिल्लीकरांनी कुणाला कौल दिला ते स्पष्ट होईल. दिल्लीत अनेक पक्षांबरोबरच अपक्ष उमेदवारांनीही दंड थोपटले. मात्र, खऱ्याअर्थी निवडणुकीला आप, भाजप आणि कॉंग्रेस यांच्यातील तिरंगी लढतीचे स्वरूप प्राप्त झाले. त्या तिन्ही प्रमुख पक्षांची राजकीय प्रतिष्ठा देशाच्या राजधानीत पणाला लागली आहे.
अल्पकाळात आपने राष्ट्रीय पक्ष बनण्याची किमया केली. सर्वप्रथम दिल्लीची सत्ता मिळाल्याने आपला ते शक्य झाले. त्या पक्षाने दिल्लीची सत्ता राखण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली. सत्ता राखल्यास आप आणि त्या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांचे राष्ट्रीय राजकारणातील महत्व वाढेल. मात्र, निकाल विरोधात गेल्यास आपच्या दृष्टीने ती घडामोड राजकीय पीछेहाट करणारी ठरेल. दिल्लीत आपसमोर यावेळी भाजपने कडवे आव्हान उभे केल्याचे मानले जाते.
भाजप दोन तपांपेक्षा अधिक काळपासून दिल्लीच्या सत्तेपासून दूर आहे. यावेळी ती कसर भरून काढण्याच्या उद्देशातून तो पक्ष अतिशय शर्थीने निवडणूक लढला. मागील २ विधानसभा निवडणुकांत कॉंग्रेसला दिल्लीत खातेही उघडता आले नाही. मात्र, यावेळी कामगिरी सुधारण्याचा निर्धार करत तो पक्ष मैदानात उतरला. बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी (एक्झिट पोल्स) भाजपच्या विजयाचा अंदाज वर्तवला आहे. तो खरा ठरणार का ते निकालातून स्पष्ट होईल.