नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकींसाठी प्रचार संपायला केवळ चार दिवस शिल्लक राहिल्याने राजकीय पक्षांनी प्रचार मोहीम तीव्र केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्व दिल्लीत प्रचार सभा घेतली.
केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी रोड शो करून मुंडका, सदरबजार, राजेंद्र नगर आणि ग्रेटर कैलाशमध्ये प्रचार सभा घेतल्या. भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांनीही शकुर बस्ती, मॉडेल टाऊन आणि चांदनी चौकात प्रचार सभा घेतल्या. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासोबत शहा यांनी काल बुरारीमध्ये एका प्रचार सभा घेतली होती.
केंद्रीय मंत्री राजनाथसिंग आणि प्रकाश जावडेकर यांनीही काल विविध भागात प्रचारसभा घेतल्या. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंदकेजरीवाल यांनी किरारी मतदारसंघात रोड शो घेतला तसेच रिठाला, लक्ष्मीनगर, विश्वासनगरमध्ये प्रचार सभा घेतल्या. उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी खिचडीपूर भागात प्रचार केला.
आपचे खासदार संजय सिंग यांनी करवाल नगर आणि घोंडामध्ये प्रचार केला. दिल्ली कॉंग्रेसने काल जाहीरनामा प्रसिद्धकेला. राजस्थानचे उप मुख्यमंत्री सचिन पायलट यांनी बादलीमध्ये प्रचार केला. कॉंग्रेस नेते आणि हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भुपिंदर हुडा यांनीही मुंडका भागात प्रचार केला.
माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांनी ग्रेटर कैलाश भागात प्रचार मोहिम राबवली. बिहारचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव दिल्ली कॉंग्रेसच्या नेत्यांसोबत आज विकासपुरीत प्रचार सभा घेतल्या. दोन्ही पक्षांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी केली आहे.