भारती विद्यापीठ पोलिसांनी केली करवाई ः पर्यटकांसाठी पादचारी मार्ग मोकळा
कात्रज – कात्रज येथील असलेले स्व. राजीव गांधी प्राणिसंग्रहालय व संशोधन केंद्राच्या प्रवेशद्वारासमोरील बाजूला महापालिकेचा पादचारी मार्ग आहे. मात्र, या पादचारी मार्गावर अनेक दिवसांपासून खाद्य विक्रेते व पथारीवाले यांच्यामार्फत झालेली अतिक्रमणे भारती विद्यापीठ वाहतूक पोलिसांमार्फत काढण्यात आली. यामुळे हा पादचारी मार्ग संपूर्णपणे मोकळा दिसत आहे. यावरून चालताना पर्यटकांना आता कोणत्याही प्रकारचा अडथळा होत नाही.
प्राणिसंग्रहालयात बाहेरील प्रवेशद्वारासमोर खाद्यपदार्थ विक्रेते व पथारीवाले यांची छोटी दुकाने आहेत.
महापालिकेमार्फत यातील काहीजणांकडे परवानगी आहे. मात्र, अनधिकृतपणे या विक्रेत्यांमार्फत पादचारी मार्गावर खाद्यपदार्थ खाण्यासाठी पर्यटकांना बसण्यासाठी टेबल व खुर्च्या मांडण्यात येत होत्या. तसेच टेबल खुर्च्या मांडलेल्या जागेवर वरच्या बाजूला प्लॅस्टिकचे कागद याचे अच्छादन टाकण्यात आले होते. तसेच या पादचारी मार्गावर लहान मुलांना आकर्षित करण्यासाठी छोटी खेळणी ठेवली जायची. यामुळे पर्यटकांना या मार्गावरून चालण्यास अडथळा निर्माण होत होता.
या पादचारी मार्गावर एकूण वीस ते बावीस परवानाधारक खाद्यपदार्थ विक्रेते आहेत. मात्र, त्यांना पादचारी मार्गावर अतिक्रमण करण्याची परवानगी नाही. त्यामुळे त्यांनी अनधिकृतपणे मांडलेल्या पादचारी मार्गावरील खुर्च्या व टेबल ही काढण्यात आली. त्यामुळे हा पादचारी मार्ग मोकळा झाल्याने प्राणिसंग्रहालयात भेट देणाऱ्या पर्यटकांना पादचारी मार्गावरून चालणे सोयीस्कर झाले
आहे.
प्राणिसंग्रहालया बाहेरील पादचारी मार्गावर ठेवलेल्या काही खुर्च्या व टेबलांमुळे चालण्यास अडचण होत होती. तर गर्दीच्या वेळेस खूप कोंडी होत होती. आता मात्र पादचारी मार्ग मोकळा झाल्याने बरे वाटते.
किरण गायकवाड, पर्यटक