वॉशिंग्टन – अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणूक अंतिम टप्प्यात आहे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर मतमोजणी आणि निकाल येण्यास उशीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र निकालांना उशीर झाल्यास अमेरिकेमध्ये नागरी असंतोष उफाळून येईल, अशी भीती फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांनी व्यक्त केली आहे.
मार्क कॅपिटोल हिल येथील एका कार्यक्रमामध्ये ते बोलत होते. यावेळी त्यांनी अन्य सोशल नेटवर्किंग साईट्स आणि खास करुन फेसबुकच्या आपल्या टीमला सतर्क केले आहे.
मार्क झुकेरबर्ग म्हणाले, अमेरिकन निवडणुकीच्या मतमोजणीमध्ये उशीर झाला किंवा काही गोंधळ झाल्यास देशामध्ये अशांतता पसरेल. हा काळ सोशल मीडियासाठी अग्नी परीक्षेसारखा आहे. फेसबुकसाठीही हा परीक्षेचा काळ आहे, असे त्यांनी सांगितले.
फेसबुकच्या माध्यमातून चुकीच्या माहितीचा प्रसार होणार नाही, यासंदर्भात ठोस निर्णय घेण्याची आणि उपाययोजना करण्याची गरज आहे. मतदारांवर कोणत्याही प्रकारे दबाव येणार नाही यासाठी योग्य ती काळजी घेणे ही सोशल मीडिया कंपन्यांची जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या आधी पैसे देऊन फेसबुकच्या माध्यमातून केलेली एक राजकीय जाहिरात फेसबुकने हटवल्यानंतर नवीन वाद निर्माण झाला होता. विरोधी पक्षांनी फेसबुकने आमच्या निवडणूक प्रचारामध्ये अडथळा आणून त्याचा प्रभाव कमी केल्याचा आरोप केला आहे. फेसबुकने एका जाहिरातील नकार दिल्यानंतर डेमोक्रॅटिक पार्टीने फेसबुकवर भेदभाव केल्याचा आरोप केला आहे.