पुणे-दुबई विमानाला बारा तासांचा विलंब

प्रवाशांना नाहक मनस्ताप : “कारभारा’बाबत सोशल मीडियावर संताप

पुणे – पुणे-दुबई या मार्गावरील “स्पाईसजेट’ विमान तब्बल बारा तासांपेक्षा अधिक काळ विमानतळावरच थांबल्याने प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागला. इतक्‍या तासांच्या विलंबामुळे प्रवाशांना संपूर्ण रात्र विमानतळावरच काढावी लागली. या “कारभारा’बाबत प्रवाशांनी सोशल मीडियावर तीव्र शब्दांमध्ये संताप व्यक्त केला.

“स्पाईसजेट’ कंपनीचे दुबईला जाणाऱ्या विमानाचे उड्डाण नियोजित वेळेनुसार रविवारी रात्री आठ वाजता होऊन दहा वाजता दुबईला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, हे विमान तीन तासांच्या विलंबाने म्हणजेच रात्री 11 वाजता उडणार असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले. प्रत्यक्षात मात्र हे उड्डाण झालेच नाही. सोमवारी सकाळी 10 वाजून 35 मिनिटांनी अखेरीस विमानाचे उड्डाण झाले.

“स्पाईसजेट एसजी 51′ हे विमान रात्री 11 वाजता उड्डाणासाठी सज्ज झाले होते. यासाठी प्रवाशांना बोर्डींग पास देखील देण्यात आले. मात्र, प्रवासी सुमारे चारतास विमानात बसून राहिल्यानंतर देखील हे विमान “जमिनीवरच’ राहिले. इतके होऊन देखील विमानतळ प्रशासनाने फारशी हालचाल केली नाही. परिणामी कंपनीकडून प्रवाशांची पुरेशी व्यवस्था करण्यात आली नसल्याचा आरोप प्रवाशांनी केला.

जवळपास साडेचौदा तासांच्या विलंब काळात प्रवाशांची गैरसोय झाली. प्रवाशांमध्ये वृद्ध, महिला आणि लहान मुलांचाही समावेश होता. त्यामुळे प्रवाशांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त करत घोषणाबाजी केली.

दरम्यान, तांत्रिक बिघाडाचे कारण देत विमानाला विलंब झाल्याचे स्पाईसजेटने सांगितले. या विलंबामुळे प्रवाशांच्या झालेल्या गैरसोयीबाबत कंपनीने दिलगिरी व्यक्‍त केली.

प्रवाशांमध्ये नाराजीचा सूर
लोहगाव विमानतळावर घडलेल्या या घटनेला काही तास उलटले नाहीत. तोपर्यंतच शिर्डीजवळ “स्पाईसजेट’ कंपनीचे “लॅन्डींग’ होतानाच धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली. या घटनेमुळे प्रवाशांचा ठोका चुकला. या “स्पाईसजेट’च्या बरोबरीने “एअर इंडिया’ कंपनीचे सॉफ्टवेअर बंद पडल्याने सुमारे 100 पेक्षा अधिक “उड्डाणांना’ विलंब झाला. “जेट’ची उड्डाणे स्थगित झाली. आता “स्पाईसजेट’ आणि “एअर इंडिया’ कंपनीमध्ये अशा घटनांचे प्रमाण वाढल्याने प्रवाशांमध्ये विमान प्रवासाबाबत नाराजीचा सूर उमटत आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.