वेतनाच्या बिलांची हार्डकॉपी दाखल करण्यात शाळांना अडचणी
पुणे – करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या कार्यालयात वेतनाच्या बिलांची हार्डकॉपी दाखल करण्यात शाळांनाही अडचणी आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक खासगी अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मार्चचे वेतन उशिरा मिळणार आहे.
शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दरमहा 1 तारखेला वेतन बॅंकेच्या खात्यात जमा होत असते. दरवर्षी मार्चचे वेतन कोणत्या ना कोणत्या कारणाने उशिरा होत असते. आर्थिक वर्ष संपत असल्यामुळे विविध करकपात केली जाते. त्यामुळे वेतनाची बिले तयार करण्यापासून ते ती तपासून धनादेश काढण्याच्या प्रक्रियेला विलंब होत होता. लॉकडाउनमुळे शासकीय कार्यालयाकडे अधिकारी व कर्मचारी फिरकत नाहीत यामुळे शुकशुकाट पसरला आहे. प्राथमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाच्या कार्यालयाद्वारे 302 शाळांमधील 5 हजार 500 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन अदा करण्यात येते.
माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाच्या वेतन पथकाद्वारे 1 हजार 200 शाळांमधील 16 हजार 500 तर, 350 कनिष्ठ महाविद्यालयातील 3 हजार 500 शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन देण्याची प्रक्रिया राबविण्यात येते. वेतनासाठी शाळांना ऑनलाइन बिले वेतन पथकाकडे पाठवावी लागतात. त्यानंतर बिलाची हार्डकॉपी ही कार्यालयात दाखल करावी लागते. त्यानंतरच शाळांना वेतनाचे धनादेश वाटप करण्यात येतात.
दरम्यान, सद्य:स्थितीत वेतन पथकाच्या कार्यालयातील काही कर्मचारी आजारी आहेत. काही कर्मचारी पोलीस येऊ देत नाहीत म्हणून कार्यालयात येत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. शाळांच्या प्रतिनिधीनाही बिले सादर करण्यासाठी वेतन पथकाच्या कार्यालयात येण्यास अडचणी आहेत. या विविध कारणांमुळे शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन मिळण्यास 10 ते 15 दिवस उशीर होणार आहे, अशी माहिती वेतन पथक कार्यालयातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
विद्यार्थ्यांकडे फी थकली
करोनामुळे शाळा बंद ठेवल्या आहेत. खासगी विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांकडे फी थकली आहे. त्यामुळे या शाळांमधील शिक्षक व कर्मचाऱ्यांना वेतन उशिरा मिळणार आहे. याबाबतची कल्पना मुख्याध्यापकांनी शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिली आहे.