वाघोली – पूर्व हवेलीसह खेड तालुक्यातील भामा आसखेड पुनर्वसनाचे शेरे काढण्यासाठी दिरंगाई होत आहे. येत्या ७ डिसेंबरपर्यंत शासनस्तरावर प्रस्ताव दाखल करावा अन्यथा पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्याचा इशारा अन्यायकारक जमीन संपादन विरोधी कृती समितीच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला.
भामा-आसखेड पुनर्वसनाचे शेरे काढण्यासाठी सन २०११ पासून आंदोलने व पाठपुरावा सुरू आहे. याबाबत पेरणे फाटा येथे ऑक्टोबर महिन्यात शेतकऱ्यांसह उपोषण आंदोलन करण्यात आले होते अशी माहिती कृती समितीचे अध्यक्ष संदीप भोंडवे यांनी माहिती दिली. यावेळी ५ ऑगस्ट २०१९ रोजीच्या शासन निर्णयानुसार पूर्व हवेली दौंड व खेड तालुक्यातील भामा आसखेड पुनर्वसनाचे शरीर कमी करण्याचे आश्वासन हवेलीचे तहसीलदार तृप्ती कोलते यांनी दिले होते. त्यामुळे उपोषण मागे घेण्यात आले होते. ६ ऑक्टोबरला हवेलीतील १६ गावांचे प्रस्ताव शासन स्तरावर मुंबई येथे दाखल करण्यात आले. परंतु प्रस्तावात त्रुटी असल्याचे सांगून सदर प्रस्ताव दुरुस्तीसाठी पुन्हा पुनर्वसन उपजिल्हाधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आले. त्यानंतर गेल्या पन्नास दिवसांपासून हे प्रस्ताव पुनर्वसन विभागातच पडून आहेत. त्यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाही.
दरम्यान पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यासाठी पुनर्वसन विभागाकडून होत असलेल्या दिरंगाई, एजंटांकडून शेतकऱ्यांची होत असलेल्या आर्थिक फसवणुक यामुळे भ्रष्टाचारास प्रोत्साहन मिळत आहे. याबाबत कृती समितीच्या वतीने निषेध करण्यात आला. येत्या ७ डिसेंबरपर्यंत शासन स्तरावर प्रस्ताव दाखल करावा अन्यथा पुणे येथे जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन करण्यात येईल असा इशारा अन्यायकारक जमीन संपादन विरोधी कृती समितीने जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद, श्रीहरी कोतवाल, रंगनाथ शिवले, कार्याध्यक्ष अंकुश कोतवाल, सरचिटणीस भाऊसाहेब शिंदे, किरण लोखंडे, अजित गायकवाड, संभाजी ढमढेरे, पदाधिकारी व बाधित शेतकरी या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे संदीप भोंडवे यांनी सांगितले.
“भामा आसखेड पुनर्वसनाचे शेरे कमी करण्यासाठी अन्यायकारक जमीन संपादन कृती समितीच्या वतीने चालू असलेल्या आंदोलनास भारतीय जनता पार्टी राज्य युवा मोर्चा यांच्या वतीने जाहीर पाठींबा आहे.”
– गणेश कुटे (सचिव, भाजप युवा मोर्चा महाराष्ट्र )
“पूर्व हवेलीसह खेड तालुक्यातील भामा आसखेड पुनर्वसनाचे शेरे काढण्यासाठी दिरंगाई होत आहे.लवकर त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात आला नाही तर संदीप भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र आंदोलन करण्यात येईल.” – संदीप सातव (संघटन सरचिटणीस, पुणे जिल्हा युवा मोर्चा)