पुणे – शहरी गरीब योजनेच्या अंमलबजावणीतील दिरंगाई आणि महापालिकेच्या दवाखाना, रुग्णालयात औषधांचा तुटवडा निर्माण झाल्याप्रकरणी नगरसेवकांनी मुख्यसभेत सोमवारी नाराजी व्यक्त केली. वर्गीकरणाद्वारे निधी उपलब्ध करून दिल्यानंतर या तक्रारी दूर होतील, असा खुलासा आरोग्य विभागाने केला.
उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे, नगरसेविका पल्लवी जावळे, वर्षा तापकीर, अर्चना पाटील, सुजाता शेट्टी, नंदा लोणकर, आरती कोंढरे, अश्विनी लांडगे, मनिषा कदम, नगरसेवक अजित दरेकर, विशाल तांबे, बाळा ओसवाल आदींनी आरोग्य सुविधांविषयी तक्रारी केल्या. औषधे मिळत नाही, औषधपुरवठा करण्याची नवीन पद्धत बदला, शहरी गरीब योजनेंतर्गत संबंधित रुग्णालयातील रुग्णांवर उपचार करण्यास नकार दिला जातो, योजनेचे पैसे मिळाले नसल्याचा दावा संबंधित रुग्णालयांकडून केला जात आहे, औषध आणि धूर फवारणी झाली नाही, सोनावणे हॉस्पिटल येथे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही, अशा अनेक तक्रारी नगरसेवकांनी मांडल्या. प्रशासनाच्यावतीने आयुक्त सौरभ राव यांनी खुलासा केला. शहरी गरीब योजनेत 10 हजार कार्डधारक आहे.
महापालिकेने घेतलेल्या निर्णयानुसार कर्करोगावरील उपचार महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये केले जाऊ लागले आहे. या योजनेत गेल्या 3 वर्षांत 22 ते 40 कोटी रुपये प्रति वर्षाला खर्च झाले आहे. यावर्षी ही रक्कम अपुरी पडणार आहे. कर्करोग झालेल्या पावणे तीनशे रुग्णांवर उपचार केले जात आहे. शिवाय डायलिसिसकरीता योजनेतून पैसे देण्यास सुरुवात झाली आहे. असे 428 रुग्ण असून, यासाठी प्रशासकीय तरतूद खर्ची पडली आहे. शहरी गरीब योजना आणि इतर सुविधा पूरविण्यासाठी आणखी 10 कोटी रुपयांची आवश्यकता आहे. ते वर्गीकरणातून उपलब्ध करून द्यावेत, असे राव यांनी सभागृहात सांगितले.