सन्मान शेतकरी योजनेचा हप्ता जमा होण्यास विलंब

शेतकऱ्यांत नाराजी, सहकारी बॅंकेत शेतकऱ्यांचे हेलपाटे

नेवासा – शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर सन्मान योजनेचा शासनाकडून मिळणारा दोन हजाराचा हप्ता जिल्हा सहकारी बॅंकेत जमा होण्यास विलंब होत असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचा सुर निघत आहे. शासनाने शेतकरी हितासाठी सन्मान शेतकरी योजनेंतर्गत सहा हजार रुपये तीन टप्प्यांत देण्याचे जाहीर केलेले आहे. मार्च अखेर पर्यंत पहिला दोन हजाराचा हप्ता देण्याचेही सांगितले होते. मात्र राष्ट्रीयकृत बॅंकेत काही जणांना या योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाल्याचेही शेतकऱ्यांनी सांगितले. परंतु जिल्हा सहकारी बॅंकेत खाते असणाऱ्या शेतकऱ्यांना अद्याप या योजनेमधील दोन हजाराचा हप्ता जमा झालेला नाही.

महसूल विभागाकडून पैसे जमा होण्यास विलंब होत असल्याची ओरड होत असतांना याबाबत स्थानिक जिल्हा सहकारी बॅंकेकडे विचारणा केली असता अनेकांचे पंधरा अंकी खाते नंबर दिले नसल्याने सर्वांचेच पैसे अडकले असल्याचे सांगण्यात आले. जिल्हा बॅकेत खाते असणाऱ्या अनेक शेतकऱ्यांनी पंधरा अंकी खाते नंबर दिले. काहींच्या खाते नंबर अपुरे असल्या कारणाने सर्वांचीच यादी रखडली आहे. परंतु जिल्हा सहकारी बॅकेकडून आता 15 दिवसांपूर्वीच सर्व योजनेत पात्र असलेल्या शेतकऱ्यांच्या यादी महसूल विभागाकडे पाठविल्याचे सांगण्यात आले असले तरीही अजून जिल्हा बॅंकेत सन्मान योजनेमधील दोन हजाराचा पहिला टप्पा जमा झालेला नाही.

खरीप हंगामासाठी आलेल्या पिक विमा रक्कमही तुटपुंजी आली आहे. सोयाबीन, तूर या पिकांचा विमाच आला नाही. केवळ बाजरी पिकाकरिताच ही विमा रक्कम आल्याचे सांगण्यात येते. तीदेखील कर्ज खात्यात बॅंकेकडून जमा होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. सध्या तालुक्‍यातील शेतकरी दुष्काळात होरपळून निघत असतांना शासकीय मदत मिळण्यास विलंब होत आहे. पाणी, चारा प्रश्‍न गंभीर बनला आहे. शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.
निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अधिकारी निवडणुकीचे कारण सांगत असले शेतकऱ्यांना मात्र मदत मिळत नाही. खरिपामधील इतर पिकांना विमा मिळाला नाही. ठराविक जणांना ही रक्कम मिळत असली तरी ती कर्जात जमा होत असल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत. सन्मान योजनेच्या दोन हजारासाठी शेतकरी जिल्हा बॅंकेच्या दारात हेलपाटे मारून थकला आहे. तातडीने मदत देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.