शहांना शुभेच्छा देण्यात नितीश यांच्याकडून विलंब

भाजप-जेडीयूचे संबंध ताणले गेल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण

पाटणा: केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांना वाढदिवसानिमित्त मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी शुभेच्छा दिल्या. मात्र, त्यासाठी बराच विलंब झाल्याने भाजप आणि जेडीयू या मित्रपक्षांमधील संबंध ताणले गेल्याच्या चर्चांना पुन्हा उधाण आले.

भाजप आणि नितीश यांच्या जेडीयूचा समावेश असलेल्या एनडीएचे बिहारमध्ये सत्ता आहे. मात्र, त्या पक्षांमध्ये मागील काही काळापासून धुसफूस सुरू आहे. बिहारमधील भाजपच्या काही नेत्यांनी तर राज्याचे नेतृत्व नितीश यांनी आमच्या पक्षाकडे सोपवावे, अशी मागणी केली. त्यावर जेडीयूकडून संतप्त प्रतिक्रिया देण्यात आली. त्यामुळे मित्रपक्षांमधील तणाव कमी करण्यासाठी स्वत: शहा पुढे सरसावले. त्यांनी काही दिवसांपूर्वी महत्वपूर्ण वक्तव्य करत पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत एनडीएचे नेतृत्व नितीश हेच करतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे दोन्ही पक्षांमधील तणाव निवळण्यास हातभार लागेल, अशी चिन्हे निर्माण झाली.

मात्र, शहा यांच्या वाढदिवशी पुन्हा तर्क-वितर्कांना खतपाणी मिळाले. विविध पक्षांच्या नेत्यांनी शहा यांचे अभीष्टचिंतन केले. त्यामध्ये बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचाही समावेश होता. तेजस्वी यांच्यानंतर तीन तासांनी म्हणजे सायंकाळी नितीश यांनी ट्विटरवरून शहा यांना शुभेच्छा दिल्या. त्या विलंबामुळे एनडीएत सर्व काही आलबेल नसल्याचे मानले जात आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.