अध्यक्षपदासाठी अजय माकन आणि जयप्रकाश अग्रवाल यांच्यात रस्सीखेच
नवी दिल्ली : भाजप आणि आम आदमी पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले असतानाच दिल्ली कॉंग्रेसमधील गटबाजीचे उफाळून आली आहे. माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनानंतर अध्यक्षपदाच्या खुर्चीसाठी माजी केंद्रीय मंत्री अजय माकन आणि जयप्रकाश अग्रवाल यांच्यात रस्सीखेच सुरू आहे.
कॉंग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकतेच दिल्लीतील नेत्यांना गटबाजी सोडून पक्षाच्या कामाला लागण्याचे आव्हान केले होते. मात्र, यानंतरही कॉंग्रेस नेते एकमेकांचे पाय ओढण्यात मग्न आहेत. ज्येष्ठ नेते दुसऱ्या नेत्याच्या कार्यक्रमातसुध्दा जायला तयार नाही. गटबाजी या थराला पोहचली आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या खात्याने तयार केलेला नवीन मोटर वाहन कायद्याला विरोध करण्यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात माजी शहरी विकास राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) अजय माकन आणि माजी प्रदेशाध्यक्ष जयप्रकाश अग्रवाल यांना बोलाविण्यात आले होते. मात्र, अग्रवाल या कार्यक्रमात सहभागी झाले नाही.
मुळात, आयोजकांनी आपल्याला कार्यक्रमाची कोणतीही माहिती दिली नाही. शिवाय न विचारत पत्रिकेत आपले नाव टाकले. अशात धरणा प्रदशर्नात जाण्याचे काहीच कारण नाही, असे अग्रवाल यांच्या कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले. मात्र, कार्यक्रमाचे आयोजन करणारे नेते चतुर सिंग यांनी पूर्व परवानगी घेण्यात आली होती, असे सांगितले.