देहूगाव – जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 14 जून रोजी देहूगाव येथे येणार आहेत. या सोहळ्याचे नियोजन व सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर तीर्थक्षेत्र देहूतील मुख्य मंदिराच्या कार्यालयात शुक्रवारी (दि. 3) सकाळी नियोजन आढावा बैठकीचे आयोजन केले होते.
पिंपरी चिंचवड शहर पोलीस आयुक्तालयाचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अप्पर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, पालखी सोहळा प्रमुख, विश्वस्त, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, हवेलीचे तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार प्रवीण ढमाले, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत जाधव, सहायक पोलीस आयुक्त नंदकुमार भोसले, वाहतूक देहूरोड विभागीय सहायक पोलीस आयुक्त अनिल दबडे, देहूरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षाराणी पाटील, तळवडे वाहतूक विभागाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत आदरवड, देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार, आचार्य तुषार भोसले, देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष रघुवीर शेलार या वेळी उपस्थित होते.
श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिराचे जीर्णोद्धार करण्यात आला आहे या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी येत आहे. त्याननिमित्त मंदिर परिसरात व मंदिरात सीसीटीव्ही कॅमेरे सज्ज करणे, मंदिरात कोण, किती जण असणार यासंदर्भात नियोजन करण्यात आले. हेलिपॅड व सभामंडप परिसर पाहणी नंतर सुरक्षिततेसाठी नियोजन करण्यात येत होते.