आढावा बैठक : तुकाराम महाराज बीज सोहळ्याचे नियोजन
देहूरोड – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा 372 व्या बीज सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांच्या सोयीसुविधा, सुरक्षिततेसाठी विविध कामांच्या नियोजनचा आढावा बैठक विविध शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थित देहूगाव ग्रामपंचायत कार्यालयात सोमवारी (दि. 2) सायंकाळी घेण्यात आली.
प्रांताधिकारी किंवा तहसिलदार यांच्या अध्यक्षतेखाली होणारी बैठक त्यांच्या अनुपस्थितने हवेलीचे गट विकास अधिकारी प्रशांत शिर्के यांच्या अध्यक्षतेत झाली.
निवासी नायब तहसिलदार अंकुश आटोळे, विस्ताराधिकारी दत्तात्रय म्हेत्रे, मंडल अधिकारी गणेश सोमवंशी, ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसूरकर, तलाठी अतुल गीते, देहूरोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडूरंग गोफणे, वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक दिलीप भोसले, सहायक पोलीस निरीक्षक शाहिद पठाण, श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे विश्वस्त विशाल मोरे, सरपंच पूनम काळोखे, उपसरपंच स्वप्नील काळोखे, ग्रामपंचायत सदस्य व माजी सरपंच हेमा मोरे, रत्नमाला करंडे, सुनीता टिळेकर, ज्योती टिळेकर, ज्योती साळुंके, सचिन साळुंके, विविध शासकीय पदाधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिन टिळक यांनी माहिती देताना, देहूगाव गाथा मंदिर ते येलवाडी दम्यानचा रस्ता अर्धवट राहिला असून, शेतकऱ्यांच्या मोबदला दराने रखडलेले आहे. त्या ठिकाणचा रस्ता वगळता संपूर्ण रिंगरोड तयार आहे. पथदिव्याचे काम झाले आहे. मात्र काही ठिकाणी वीज पुरवठा सुरू नसल्याने ते पथदिवे बंद आहे. 126 युनिटचे 2 सुलभ शौचालय आहे. अंतर्गत रस्ते झाले असल्याची माहिती दिली. बंद पथदिवे लवकरच सुरू करून घ्यावेत, असे शिर्के यांनी सांगितले.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता धनंजय जगधने यांनी सांगितले की सध्या पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत चालविते. त्यांना आवश्यकतेनुसार आम्ही सहकार्य करू असे सांगितले. यावर ग्रामपंतायतीच्या वतीने जलशुद्धीकरणासाठी क्लोरीनचा मुबलक साठा उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आला असल्याचे सांगितले.
जलशुध्दीकरण प्रकल्पावर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना सहकार्याने पाणी पुरवठा सुरळीत ठेवण्यात येईल. यात्रा काळात गावात सर्वत्र 24 तास पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन देण्यात आले, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुरकर यांनी सांगितले.
पीएमपीएमएलचे समन्वय अधिकारी संतोष माने यांनी सांगितले की, यात्रा काळात प्रवाशी वाहतुकीसाठी नेहमी उपलब्ध असणाऱ्या बसेस वगळता अतिरिक्त तीन दिवसांत जादा बसेस मार्गावर धावतील. या काळात देहूरोडकडे जाणाऱ्या बसेससाठी अनगडशहावली दर्गाजवळ व तळवडे जकात नाक्याजवळ निगडी व आळंदीसाठी खासगी जागेत तात्परते बस स्थानक उभारण्यात येणार असल्याची माहिती दिली.
आपत्कालीन व्यवस्थापनाची तयारी…
ग्रामपंचायतीच्या वतीने आरोग्य, विद्युत, शुद्ध पाणीपुरवठा, मोबाईल शौचालय, पाण्याचे टॅंकर आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांकडून घनकचरा, गटारे, नाले, शौचालये, स्वच्छतागृह, सफाई करण्याची कामे सुरू करण्यात येत आहेत. ठिकठिकाणी डीडीटी पावडर टाकणे, औषध फवारणी करण्यात येणार असून जलशुद्धीकरणासाठी टीसीएल व मेडिक्लोर, बीएचसी पावडर मागविण्यात आली आहे.
देहूरोड कॅंटोन्मेंट बोर्ड व पिंपरी-चिंचवड महापालिका व तळेगाव नगरपरिषद यांच्याकडून अग्निशमन बंब व्यवस्था करण्यासाठी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. आपत्कालीन व्यवस्थापन करण्यासाठी संत तुकाराम विद्यालयातील 42, प्राथमिक शाळेतील 14 व अंगणवाडीतील 9 खोल्या सज्ज ठेवण्यात आले आहेत.
देहूगावात 9 मार्चपासून वाहतूक नियंत्रण करण्यात येईल. 10 मार्चला सायंकाळी चार वाजल्यापासून जड वाहनांना व चारचाकी वाहनांना देहूत पूर्णपणे प्रवेश बंद करण्यात येईल. वाहतूक तळवडे, चाकण, तळेगाव मार्गे, देहूरोड मार्गे वळविण्यात येईल. यात्रेच्या दिवशी स्थानिकांसह कोणतीही वाहने गावात सोडणार नाही. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
– दिलीप भोसले, पोलीस निरीक्षक (वाहतूक).