देहूकरांचा पाणीप्रश्‍न सुटला!

पाणी पुरवठा योजना ताब्यात घेण्यास ग्रामसभेत मान्यता
कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणार : महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सहा महिने सहकार्य करणार
पाणी पुरवठा योजना ताब्यात घेण्यास ग्रामसभेत मान्यता

देहुरोड – महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडील पाणी पुरवठा योजना देहू ग्रामपंचायतीने ताब्यात घेण्यास ग्रामसभेत तत्त्वत: मान्यता दिली. त्यामुहे श्री क्षेत्र देहूगावचा पाणी प्रश्‍न लवकरच मिटण्याची शक्‍यता आहे. ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यास पुढील सहा महिने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तयार झाले असले, तरी सध्या जीवन प्राधिकरणचे ठेकेदारीवर असलेले कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही योजना चालवावी त्यांचा पगार ग्रामपंचायतीने द्यावा असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र या बाबत ग्रामपंचायतीला कर्मचारी भरती प्रक्रिया, वेतन आणि त्यासाठीची प्रक्रिया करावी लागणार आहे.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या वतीने गेल्या चार वर्षांच पाणी पुरवठा ताब्यात घ्यावी यासाठी चार वेळा योजना बंद केली. प्रत्येक वेळी वरिष्ठ पातळीवर चर्चा होवून योजना चालू ठेवण्यात आली होती. मात्र वाढती थकबाकी आणि सातत्याने होणारा तोट्याने हस्तातरीत करणे आवश्‍यक असल्याचे मत “एमजीपी’चे कार्यकारी अभियंता एस. एस. कोळी यांनी सांगितले. त्यापार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि. 27) सरपंच ज्योती टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. सचिव अर्जुन गुडसुरकर यांनी सभेचे काम पाहिले.

हवेली पंचायत समिती सभापती हेमलता काळोखे, उपसरपंच निलेश घनवट, ग्रामपंचायत सदस्य उषा चव्हाण, सुनिता टिळेकर, दिनेश बोडके, अभिजित काळोखे, संतोष हगवणे, सचिन विधाटे, स्वप्नील काळोखे, ज्योती साळुंके, पूनम काळोखे, राणी मुसूडगे, जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता एन. एन. भोई, उपाभियंता एस. डी. पाठक, शाखा अभियंता धनंजय जगधने, मधुकर कंद, माऊली काळोखे, सोमनाथ मुसूडगे, संदीप शिंदे, पोलीस पाटील चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

सकाळी अकरा वाजता ग्रामसभेला सुरवात झाली. या वेळी गणसंख्येअभावी सरपंच टिळेकर यांनी सकाळी 11.35 वाजेपर्यंत ग्रामसभा तहकूब करण्यात आली. मात्र पाणी प्रश्‍न गंभीर असल्याने ही सभा आजच घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. या वेळी सचिव गुडसुरकर यांनी तहकूब सभा आज घेणे कायदेशीर होणार नाही. ही सभा 4 जूनला होईल असे सांगितले. या वेळी ग्रामस्थांमध्ये चलबिचल होवून आजच तहकूब सभा घ्या, असे सांगितले. यानंतर सभापती हेमलता काळोखे यांनी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी तानाजी लोखंडे व जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांच्याशी संपर्क करून अधिक माहिती घेतली. त्यांच्या सुचनेनुसार पाणी प्रश्‍न गंभीर असल्याने तहकूब सभा आजच घेवू शकता असे स्पष्टीकरण दिल्याने सभा घेण्यात आली.

बेकायदेशीर नळजोड बंद करा…
पूर्वीच्या साध्या पाणी मीटरला ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी विरोध केल्याने बसविले नाहीत ते टेंडर रद्द झाले. नव्या मीटरचे अंदाजपत्रकाला अद्याप मंजुरी मिळाली नाही, सध्या मीटर बसविण्यासाठी तरतूद नाही म्हणून मीटर बसविले नाहीत. यासाठी ग्रामपंचायतीने पाठपुरावा करावा असे सांगितले. सुनिता टिळेकर यांनी बेकायदेशीर नळजोड कसे दिले, ते बंद करून द्यावेत असे सांगितले. माऊली काळोखे व मधुकर कंद यांनी ही योजना ग्रामपंयतीने तत्त्वत: मान्यता देवून ताब्यात घ्यावी, असा विषय मांडला व त्याला मान्यता देण्यात आली. यासाठी ग्रामपंयातीला कर्मचारी नेमणूक वेतन ठरविणे ही कामे करावी लागतील, तोपर्यंत काय करायचे हा प्रश्‍न असल्याचे सांगितले. यासाठी तातडीने निर्णय घेवून योजना ताब्यात घ्यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

पाणीपुरवठा विभागाची समिती स्थापणार
या वेळी ग्रामपंयातीची बाजू गुडसुरकर यांनी मांडत 24 मे ला झालेल्या मासिक सभेतील चर्चा याची माहिती दिली. तांत्रिक बाजू तपासणी करून योजना ताब्यात घेण्याबाबत निर्णय घेवू असा निर्णय झाल्याचे सांगितले. यावेळी पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागाच्या शिल्पा सोरटे यांनी तांत्रिक तपासणी करावी लागेल, यासाठी समिती स्थापन करावी लागेल, समितीमध्ये 50 टक्के महिला आवश्‍यक आहेत. त्यांचा अहवालनंतर याबाबत योजना पूर्ण आहे किंवा कसे याबाबत निर्णय घेता येईल, असे सांगितले.

संदीप शिंदे यांनी योजना पूर्ण करावी, मीटर बसवावे असा विषय मांडला यावर विचार विनिमय होत असताना जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता भोई यांनी सांगितले की, पाणी पुरवठा डिसेंबर 2017 ला पूर्ण झाली आहे. वितरण व्यवस्था, टाक्‍या ही कामे सार्वजनिक बांधकाम विभाग करणार होते. यासाठी तीर्थक्षेत्र विकास कार्यकारी समितीकडे पाठपुरवा करणे आवश्‍यक आहे.

पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायतने ताब्यात घेतली पाहिजे, असे वरिष्ठ पातळीवरील अधिकारी व पदाधिकारी यांनी सांगितले आहे. या योजने संदर्भात जिल्हा परिषद व पंचायत समिती यांचे तांत्रिक अधिकारी येवून मार्गदर्शन करतील, त्यांच्या सहकार्याने ही योजना सुरू करू शकतो. या ठरावाला ग्रामस्थ म्हणून पाठिंबा दर्शविला.

– हेमलता काळोखे, सभापती, पंचायत समिती, हवेली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.