देहूगाव ग्रामपंचायतची वॉर्ड रचना, आरक्षण जाहीर

देहूरोड – देहूगाव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तयारीस सुरुवात झाली आहे. सध्याच्या ग्रामपंचायतीचा कार्यकाळ जुलै महिन्यात संपणार आहे. हवेली पंचायत समितीचे विस्ताराधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी (दि. 30) झालेल्या विशेष ग्रामसभेत वॉर्ड रचना कायम करण्यात आली. वॉर्ड निहाय आरक्षणे जाहीर केली. सहायक अध्यासी अधिकारी म्हणून गाव कामगार तलाठी अतुल गीते व ग्रामविकास अधिकारी अर्जुन गुडसुकर यांनी या वेळी कामकाज पाहिले.

देहूगावची नव्याने वॉर्ड रचना करण्यात आली आहे. यामध्ये काही वॉर्डांमध्ये बदल झालेत. त्यानुसार आरक्षणात बदल झाला आहे. या नव्या रचनेनुसार वॉर्ड क्रमांक एकमध्ये माळीनगर व बोडकेवाडीचा समावेश आहे. यात एकूण 3 सदस्य असून, एक जागा सर्वसाधारण ओबीसी, एक जागा सर्वसाधारण व एक जागा सर्वसाधारण महिलेसाठी आहे.

वॉर्ड क्रमांक दोनमध्ये देहूगाव गावठाण व जिल्हा परिषदेच्या शाळेमागील भागाचा समावेश आहे. या वार्डमध्ये तीन 3 जागा असून, एक जागा ओबीसी महिला, एक जागा सर्वसाधारण व एक जागा सर्वसाधारण स्त्रीसाठी असणार आहे. वॉर्ड क्रमांक तीनमध्ये चव्हाणनगर, गाथामंदिर परिसर आणि गंधर्वनगरीचा समावेश आहे. या वॉर्डमध्ये दोन सदस्य असून, एक जागा अनुसूचित जाती महिला व एक जागा अनुसूचित सर्वसाधारण यांच्यासाठी आहे. वॉर्ड क्रमांक 4 मध्ये प्राथमिक आरोग्यकेंद्र कॉटर्स ते कमान, ओंकार सोसायटी, भीमाशंकर सोसायटी, कंद पाटीलनगर व तेथून भसे कॉम्प्लेक्‍स ते गायरान येथील एसटीपी प्लॉटपर्यंतचा भाग आहे.

या वॉर्डमध्ये तीन जागा असून, एक जागा सर्वसाधारण ओबीसी, एक जागा अनुसूचित जमाती स्त्रीसाठी तर एक जागा सर्वसाधारणसाठी आहे. वॉर्ड क्रमांक 5 मध्ये युनिक हॉस्पिटलपासून तळवडे शीव, विठ्ठलनगरचा देहू-आळंदी रस्त्याच्या डाव्या बाजूचा पेट्रोल पंपपर्यंत भाग येणार आहे. यात एक जागा अनुसूचित जाती महिलासाठी, एक जाग ओबीसी महिलेसाठी व एक जागा सर्वसाधारणसाठी आहे.

वॉर्ड क्रमांक सहामध्ये देहूगाव कमान जुना पालखी मार्ग तळवडे शीव देहू-आळंदी रस्त्याच्या उजवीकडील बाजू संपूर्ण याचा समावेश आहे. या वॉर्डमध्ये एक जागा ओबीसी महिलेसाठी, एक जागा सर्वसाधारण स्त्री व एक जागा सर्वसाधारणसाठी आहे. अशा 17 जागा असतील. या वेळी ग्रामपंचायतीमध्ये खुल्या प्रवर्गातील पाच पुरुष व 3 महिला. अनुसूचित जातीमध्ये 2 स्त्रीया व एक पुरुष. ओबीसी मध्ये 3 महिला व 2 पुरुष, तर अनुसूचित जमातीमध्ये एक स्त्री असणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.