देहूगाव – देहूगाव परिसरातील काही मोठ्या व्यावसायिकांनी व भाजीपाला विक्रेत्यांनी शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे. एक पेट्रोल पंप बंद तर दुसरा दिवसभर सुरू ठेवण्यात आला होता. करोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्याकडून विविध सूचना व आदेश देण्यात आले आहेत परंतु याकडे व्यावसायिक दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.
नागरिकांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यासाठीही ठराविक वेळेत दुकाने सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. दुकान पुढे सुरक्षित अंतर ठेवून करोना संदर्भातील सुरक्षितता, उपाययोजना आणि जनजागृती करण्याचेही आदेश दिले आहेत. मात्र काही दुकानदारांनी प्रशासनाला न जुमानता दुकानात ग्राहकांची गर्दी होत असतानाही मालीची विक्री केली. ग्राहकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी कोणतीही उपाययोजना केलेली नाही. तर काही दुकानदारांनी केवळ दिखाव्यासाठी पांढरे चौकोन आखले होते. तर एका होलसेल विक्रेत्याने ग्राहकांसाठीचे उत्तम नियोजन केले होते. भाजीविक्रेते अद्यापही करोनाबाबत जागृत झालेले दिसत नाही. सलग बसलेल्या भाजीविक्रेत्यांमुळे आणि होणाऱ्या ग्राहकांच्या गर्दीने बाजार भरून गेला होता.
देहूगाव परिसरातील अनगडशहा दर्ग्याजवळील बाह्यवळण मार्गावरील एका पेट्रोल पंपावर दुचाकी व चारचाकी वाहनांमध्ये निर्धारित वेळेपेक्षाही जास्त वेळ डिझेल व पेट्रोल भरून दिले जात असल्याने मोठ्या प्रमाणात ग्राहकांनी गर्दी केली होती. मोठ्या प्रमाणात गर्दी होत असताना करोना व्हायरसच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून कोणतेही उपाययोजना केलेली नव्हती.
शासनाच्या आदेशानुसार पेट्रोल पंप सुरू ठेवण्याचे आदेश असून अत्यावश्यक सेवेसाठीच वापरली जाणाऱ्या वाहनांना पेट्रोल व डिझेल देण्यात यावेत, असे आदेश असतानाही देहू-आळंदी रस्त्यावरील पेट्रोल पंप कामगार नसल्याचे कारण देत बंदच ठेवला असल्याने ग्राहकांची गैरसोय झाली.