देहू, येलवाडीला जोडणारा रिंगरोड अर्धवट; मुख्यमंत्र्यांना निवेदन

रिंगरोडसाठी आमरण उपोषणाचा इशारा

देहूगाव – तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत तयार केलेल्या रिंगरोड वरील तीर्थक्षेत्र देहू आणि येलवाडीला जोडणाऱ्या इंद्रायणी पुलाजवळ प्रलंबित असलेले अर्धवट काम पूर्ण करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्ते वसंत भसे यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांना निवेदन दिले आहे.

तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत पाच वर्षांपूर्वी सुरू केलेले रिंगरोड व त्यावरील पूल, पथदिवे तयार करण्यात आले. मात्र देहू आणि येलवाडी या दोन गावांना जोडणारा (फेज 1.1 रस्ता) इंद्रायणी नदीवरील नवीन पूल तयार करण्यात आल्यानंतर येलवाडी (खेड तालुका) हद्दीतील एका शेतकऱ्याचे भूसंपादन प्रक्रियेचा प्रश्‍न निर्माण झाल्याने हे काम सुमारे तीन-चार वर्षांपासून प्रलंबित आहे.

सुमारे तीन वर्षांपासून प्रत्येक यात्रेच्या पूर्वी भाविक वारकऱ्यांच्या सोयी-सुविधा आणि सुरक्षिततेच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाची नियोजन आढावा बैठकीत संबंधित शेतकऱ्यांच्या भूसंपादन प्रक्रियेमुळे प्रलंबित असलेल्या अर्धवट कामाचा वारंवार प्रश्‍न निर्माण होत आहे.

मार्च महिन्यातील बीज सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर प्रशासनाने आढावा बैठक झाली असताना बैठकीत उपस्थित आमदार सुनील शेळके यांनी संबंधित शेतकऱ्याला बोलावून घेत सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपस्थित असलेले पदाधिकारी यांचा समझोता करीत तात्पुरता तोडगा काढला.

यात्रा झाल्यानंतर मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष झाल्याने शेतकऱ्यांने पुन्हा रस्ता खोदल्याने वाहनासह पादचाऱ्यांचाही येण्या-जाण्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. यात्रेनंतर सहा महिने उलटूनही अद्यापपर्यंत प्रश्‍न प्रलंबित आहे. हे काम अपूर्ण असल्यामुळे वारंवार अनेक अडचणी निर्माण होत आहेत. संबंधित शेतकऱ्याच्या भूसंपादन प्रक्रियेत त्यावर अन्याय होऊ नये. तसेच देहू-येलवाडी (फेज 1.1) या रस्त्यावर शासनाकडून निर्माण झालेल्या त्रुटी दूर करण्यात याव्यात, अशी मागणी केली असून, महात्मा गांधी जयंतीनिमित्त प्रलंबित कामाजवळ आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.