गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या इच्छुकांचा हिरमोड
– रामकुमार आगरवाल
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होताच नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदी संधी मिळावी याकरिता रस्सीखेच सुरू आहे. निवडणूक लांबणीवर पडल्याने बहुतेक इच्छुकांचा हिरमोड झाला आहे.
तीर्थक्षेत्र देहू ग्रामपंचायत बरखास्त झाल्यानंतर ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर होताच नगरपंचायतीचे पहिले नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदी वर्णी लागण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांचे निवडणूक लांबणीवर पडल्याने हिरमोड झाला आहे.
तीर्थक्षेत्र देहू ग्रामपंचायतच्या पंचवार्षिक सदस्यांचा ऑगस्ट महिन्यामध्ये कार्यकाल संपुष्टात आला. 23 ऑगस्टपासून प्रशासकीय कारभार सुरू झाला. प्रशासकीय अधिकारी म्हणून एम. पी. वाघमारे यांची नियुक्ती झाली. मात्र, तीन महिन्यांनंतर म्हणजे 8 डिसेंबर रोजी देहूची ग्रामपंचायत बरखास्त होऊन नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाले. देहूच्या नगरपंचायतीसाठी प्रभारी अधिकारी म्हणून प्रशासक तथा मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची नियुक्ती झाली.
देहूच्या नगरपंचायतीमध्ये प्रथम नगराध्यक्ष आणि नगरसेवकपदी वर्णी लागावी म्हणून गुडघ्याला बाशिंग बांधून अनेकांनी मोर्चा बांधणी सुरू केली. इच्छुकांनी मतदारांसह प्रभाग/वार्डाची स्वयंघोषित रचना आखत मतदारांशी थेट संपर्क साधला. गाठीभेटी सुरू करण्यात केलेल्या दिसतात. अनेकांनी तर नवीन वर्ष, मकर संक्रांतीच्या शुभेच्छा कार्ड, तीळगुळ, चिक्की वाटप केले. मित्र, कार्यकर्ते, मतदारांचे वाढदिवसाबरोबरच हळदी-कुंकू या सारख्या कार्यक्रमांसह विविध कार्यक्रम आयोजित करीत जनसंपर्क ठेवला. अनेक नवोदित तरूण इच्छुक उमेदवारांनी स्व: खर्च करीत नवीन मतदार नोंदणी, आधार कार्ड, शिधापत्रिका बनविणे तसेच शासकीय विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तत्परता दाखवीत समाजसेवाचा वसा-वारसा दर्शवित प्रारंभ केला होता. तर काहीनी स्वतःचे जनसंपर्क कार्यालय उघडले आहेत.
ग्रामपंचायतीचा पंचवार्षिक कार्यकाल, नंतर ग्रामपंचायत प्रशासकीय कारभार संपुष्टात येऊन नगरपंचायतीचे ही प्रशासकीय कामकाजास तीन महिने उलटून गेले. करोना महामारी संकटामुळे नागरिकांची आर्थिक परिस्थिती ढासळलेली आहे. ग्रामपंचायतीमध्ये कर भरणा न झाल्याने करोना काळातील खर्चाने ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती ढासळलेली होती. तर सहा महिन्यांच्या या प्रशासकीय कामकाजामध्ये सुद्धा मालमत्ता, पाणीपट्टी, कर वसुली न झाल्याने सध्या आर्थिक संकटात सापडलेल्या नगरपंचायतीवर मैला शुद्धीकरण व पाणीपुरवठा प्रकल्प तसेच पथदिवे यांचा सुमारे 35 लाखांचा महापारेषणचे विद्युत बिल थकीत झाले आहे.
…म्हणून निवडणूक प्रक्रिया लांबली
तात्कालीन ग्रामपंचायतीच्या काळात 2011 च्या जनगणनेनुसार ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नव्याने सहा वार्ड रचना तयार करण्यात आले होते. ते प्रसिद्धही करण्यात आले होते. नव्याने तयार करण्यात आलेले ग्रामपंचायतीचे सहा वार्ड असणार की नगरपंचायतीसाठी नव्याने सतरा प्रभाग/वार्ड होणार तसेच महिला, आरक्षित, राखीव वार्ड याबाबत अद्याप कोणतेही चिन्ह स्पष्ट झाले नसल्याने तर वार्ड किंवा प्रभाग रचना, आरक्षण, महिला वार्ड राखीव जागा कधी जाहीर होणार ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
तर या सर्व नियोजनार्थ किमान तीन ते चार महिन्यांचा कालावधी लागत असल्याने देहू नगरपंचायतीची निवडणूक लांबणीवर पडल्याचे स्पष्ट होत आहे. किमान चार किंवा पाच महिन्यानंतर निवडणूक होईल, अशी माहिती महसूल विभागाच्या सूत्रांकडून मिळत असल्याने अद्याप नगरपंचायतीच्या निवडणुकीचे कोणतीही चिन्ह दिसून येत नसल्याने ग्रामपंचायत बरखास्तीनंतर प्रलोभने देत खर्च करीत आहेत. दोन महिन्यांपासून कंबर कसून तयारी करणाऱ्या इच्छुक उमेदवारांचा हिरमोड झाला आहे