- 17 प्रभाग, वार्ड नकाशा प्रसिद्ध
आरक्षित महिला 9, अनुसूचित जातीसाठी 2 - नागरिकांचा मागास प्रवर्गसाठी 2, सर्वसाधारण महिलांसाठी 5.
देहूगाव – तीर्थक्षेत्र देहू नगरपंचायतीच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती महिला, नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग अथवा नागरिकांचा मागास वर्ग प्रवर्गातील महिला व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 12) दुपारी बारा वाजता शाळेतील बाल विद्यार्थ्यांच्या हस्ते चिट्ठीद्वारे काढण्यात आली. तत्पूर्वी 17 वार्डांच्या हद्दीचा नकाशा (रचना) प्रसिद्ध करण्यात आला आहे.
हवेलीचे प्रांताधिकारी संजय अस्वले आणि नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी डॉ. प्रशांत जाधव यांनी निवडणूक आरक्षित जागा सोडत कामकाज पाहिले. ग्रामपंचायतीचे माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, इच्छुक उमेदवार, विविध पक्षातील पदाधिकारी, ग्रामस्थ व नागरिकांच्या उपस्थितीत शाळेतील लहान विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून आरक्षण जाहीर केले. शासनाच्या नियमानुसार अनुसूचित जातीसाठी 3 जागा आरक्षित व त्यामध्ये महिलांसाठी 50 टक्के आरक्षण असल्याने 2 जागा निश्चित करीत टक्केवारीनुसार उतरत्या क्रमांकाने वार्ड निश्चित करण्यात आले. मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या काढत सर्वांसमोर वार्ड क्र. 9 व 3 अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित तर वार्ड क्र. 4 अनुसूचित जातीसाठी सर्वसाधारण जाहीर करण्यात आले. त्यानंतर वार्ड क्र. 1 अनुसूचित जमाती सर्वसाधारणसाठी जाहीर करण्यात आले.
उर्वरित 13 वार्डांच्या चिठ्ठ्या बरणीमध्ये टाकून त्यातील चार चिठ्ठ्या काढत अनुक्रमे वार्ड क्र. 11, 12, 14 व 15 नागरिकांचा मागास प्रवर्ग वार्ड निश्चित करण्यात आल्यानंतर त्यामध्ये सोडतीद्वारे 12 व 15 हे वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला आरक्षित तर 11 व 14 हे वॉर्ड नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारणसाठी जाहीर करण्यात आले. उर्वरित 9 जागेमध्ये 5 सर्वसाधारण महिला निश्चित करीत 9 चिठ्ठ्यांतून अनुक्रमे 2, 6, 8, 13 व 17 हे वार्ड सर्वसाधारण महिलांसाठी तर उर्वरित चार जागा अनुक्रमे वार्ड क्र. 5, 7, 10 आणि 16 हे वार्ड सर्वसाधारण जाहीर करण्यात आले.