वारंवार तक्रार करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष; मनसेचे शिष्टमंडळ आज कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाची घेणार भेट
पिंपरी : देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत निर्माण होणारा कचरा निगडीतील भक्ती-शक्ती चौकापासून जवळच असलेल्या लष्कराच्या मोकळ्या जागेत जाळला जात आहे. त्यातून निघणाऱ्या धुरामुळे निगडी-प्राधिकरण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींच्या वतीने करण्यात येत आहे.
याबाबत वारंवार तक्रार करूनही कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि महापालिका प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यामुळे या प्रश्नावर आंदोलन करण्याचा इशारा मनसेच्या वतीने देण्यात आला आहे. दरम्यान, याबाबत देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड प्रशासनाची मंगळवारी (दि. 25) दुपारी 12 वाजता मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ भेट घेणार आहे. कचऱ्याचा प्रश्न सोडविण्याची मागणी त्या प्रसंगी करण्यात येणार आहे.
लष्कराच्या मोकळ्या जागेत जाळण्यात येणाऱ्या कचऱ्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, निगडी गावठाण, रुपीनगर, यमुनानगर, त्रिवेणीनगर आणि प्राधिकरण परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत मनसेचे शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी महापालिका आयुक्त आणि देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मागणी केली आहे.