देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाच्या प्रारूप वॉर्ड रचनेत फेरबदल!

प्रशासनाकडून चौकशीचे आदेश : सोशल मीडियावर “व्हायरल’ने खळबळ

देहुरोड – देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील मतदाराची नावे वगळल्यानंतर प्रशासनाने तयार केलेली सात वॉर्डांची फेरबदल केले. फेरबदलानंतर तयार केलेली प्रारूप वॉर्ड रचना बोर्डाच्या बैठकीपूर्वीच गुरुवारी (दि. 31) सायंकाळी सोशल मीडियावर “व्हायरल’ झाली. “व्हायरल मॅसेज’ने शहर परिसरातील राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा रंगू लागली आहे.

देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्डाने शासकीय जमिनीवर बांधकाम करून वास्तव्यास असणाऱ्या अतिक्रमितांची नावे मतदार यादीतून वगळल्यानंतर 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केलेल्या सात वॉर्डांच्या अंतिम मतदार यादीनुसार वॉर्डांतील मतदार संख्या कमी अधिक झाली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार रक्षा संपदा महानिर्देशालयाच्या सूचनेनुसार सरकारी जागेवरील सुमारे साडेसात हजारांहून अधिक अतिक्रमितांची नावे बोर्डाच्या मतदार यादीत समाविष्ट करण्यात आलेली नाहीत. परिणामी वॉर्ड क्रमांक तीनमध्ये (गांधीनगर, आंबेडकरनगर) अवघे 69 मतदार उरले आहेत. तर शेलारवाडी-कोटेश्‍वरवाडी वॉर्डात सर्वाधिक 5 हजार 385 मतदारसंख्या आहे. तसेच अनुसूचित जात व अनुसूचित जमातीच्या मतदार संख्येतही बदल झाला आहे.

महानिर्देशालयाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सर्व सात वॉर्डांमधील मतदारसंख्या समान असणे गरजेचे असून, केवळ वॉर्डांच्या हद्दीप्रमाणे दहा टक्‍के कमी -अधिक मतदारसंख्या ठेवता येते. बोर्डाची निवडणूक 2020 मध्ये होणे अपेक्षित आहे. त्यापूर्वी वॉर्डांच्या पुनर्रचना प्रक्रिया करण्याबाबतचा ठराव 17 सप्टेंबरच्या विशेष सभेत मंजूर केला. त्यानंतर ठराव वरिष्ठांना पुढील कार्यवाहीसाठी पाठविण्यात आला होता.

विविध वॉर्डांत मतदार संख्येत मोठी तफावत असल्याने सात वॉर्डांची पुनर्रचना करण्याबाबत निर्देश प्राप्त झाले होते. त्यानुसार गेल्या एक महिन्यापासून बोर्ड प्रशासन प्रारूप वॉर्ड रचना करण्यात व्यस्त होते. गुरुवारी सायंकाळी बोर्ड सदस्यांच्या अनौपचारिक बैठकीत सीईओ रामस्वरूप हरितवाल यांनी बोर्डाने तयार केलेल्या प्रारूप वॉर्ड रचनेबाबत 5-6 प्रारूपांपैकी एक प्रारूप रचनेची माहिती देण्यात आली.

या बैठकीला सात सदस्यातील गोपाळराव तंतरपाळे यांना वगळता सहा सदस्य उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर देहुरोड परिसरात सोशल मीडियावर कॅंटोन्मेंट बोर्डाच्या सात वॉर्डांची फेरबदलांची प्रारूप वॉर्ड रचनेची एक प्रत सोशल मीडियावर व्हायरल झाली. यासंदर्भात वर्तमान पत्राला आणि अधिकृत बोर्ड बैठक न होता ही माहिती पसरली होती. त्यामुळे कोणत्या वॉर्डात किती मतदार आहेत, कोणत्या वॉर्डाला कोणता भाग जोडला आहे. आकडेवारीवरून कोणता वॉर्ड अनुसूचित जाती-जमातीसाठी आरक्षित होऊ शकतो, स्वहितार्थ फेरबदल केले असल्याबाबत देहुरोड परिसरात राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह सामान्य नागरिकांमध्येही उलटसुलट चर्चा रंगली आहे. वॉर्ड रचनेला विरोध करताना कोणी दुखावले जाऊन पुढे निवडणुकीत याचा विपरीत परिणाम होऊ नये म्हणून जाणीवपूर्वक सोशल मीडियावर वॉर्ड रचना टाकण्यात आल्याची शक्‍यता ही वर्तवली जात होते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या शिष्टमंडळाने घेतली “सीईओं’ची भेट
गुरुवारी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या बोर्डाच्या सात वॉर्डांच्या प्रारूप रचनेबाबत देहुरोड शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष ऍड. कृष्णा दाभोळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने कॅंटोन्मेंट बोर्डाचे सीईओ रामस्वरूप हरितवाल यांची भेट घेतली.

वॉर्ड पुनर्रचनेबाबत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करून टाकणारी व्यक्‍ती किंवा सदस्य करीत आहेत. यासंदर्भात तातडीने चौकशी करण्यात येईल. केवळ बोर्ड सदस्यांना माहितीसाठी दिले असताना सोशल मीडियावर प्रारूप वॉर्ड रचना टाकणाऱ्या बोर्ड सदस्याची चौकशी करण्यात येईल.
– रामस्वरूप हरितवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी, देहुरोड कॅंटोन्मेंट बोर्ड.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.