नागपूर – सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शरद अरविंद बोबडे यांच्या आईची सुमारे अडीच कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली आणि त्यानंतर नागपूर पोलिसांनीआरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
तापस घोष असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. नागपूर पोलीस झोन 2च्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर येथे आकाशवाणी चौकात त्यांचे वडिलोपार्जित “सीझन लॉन’ आहे. हे लॉन लग्नकार्य तसेच इतर कार्यांसाठी भाड्याने दिले जाते. गेल्या 12 वर्षांपासून तापस घोषला हे लॉन चालवण्यासाठी दिले होते.
तापस घोष हाच लॉनचे भाडे आणि इतर आर्थिक व्यवहार करत होता. मुक्ता बोबडे या वयोवृद्ध आणि आजारी असल्याचा फायदा घेत तापस घोष याने भाडे म्हणून मिळणाऱ्या रक्कमेच्या बनावट पावत्या बनवल्या आणि हेराफेरी केली. एकूण 2.5 कोटी रुपयांची आरोपीने फसवणूक केली आहे.
आपली फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच बोबडे कुटुंबाने पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीनुसार, पोलिसांनी कारवाई करत आरोपी तापस घोष याला अटक केली आहे. या प्रकरणी नागपूर पोलीस अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, आरोपी तापस घोष याला अटक करुन न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला 16 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.