पिंपरी – शिक्षण मंडळावर नियुक्तकरावयाच्या सदस्यांच्या निवडीचा घोळ भाजपकडून अद्याप सुरू असला तरी राष्ट्रवादीचे सदस्य मात्र निश्चित झाले आहेत. यामध्ये भाऊसाहेब भोईर, वैशाली काळभोर, सुलक्षणा धर-शिलवंत यांचा समावेश आहे. शनिवारी (दि. 20) आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये शिक्षण मंडळासाठी सदस्य निवड करण्यात येणार होती. शिवसेना, भाजपा आणि राष्ट्रवादीच्या संख्याबळानुसार सदस्यांची निवड करण्याचा विषय सभेसमोर ठेवण्यात आला होता.
भाजपाचे सदस्य निश्चित न झाल्यामुळे आजची सभा तहकूब करण्यात आली. एका बाजूला भाजपाचा सदस्य निवडीचा घोळ कायम असल्याची कबुलीच पक्षनेते एकनाथ पवार यांनी सभा तहकूब करून दिली आहे. राष्ट्रवादीने मात्र शिक्षण मंडळातील सदस्यांची नावे सभेपूर्वी निश्चित केली आहेत. मंडळावर काम करण्यासाठी ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भाईर यांना संधी देताना पक्षाची भूमिका ते मंडळात आक्रमकपणे मांडतील, असा त्यामागे हेतू आहे.