संरक्षण क्षेत्रातील कंपन्या तेजीत

मुंबई – केंद्र सरकारने संरक्षण साहित्य उत्पादन क्षेत्रात दीर्घ पल्ल्याचे आत्मनिर्भर धोरण जाहीर केले आहे. त्यामुळे देशातील संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात सोमवारी वाढ झाली.

आजच्या कामकाजाविषयी बोलताना एलकेपी सिक्‍युरिटीज या संस्थेचे संशोधन प्रमुख रंगनाथन यांनी सांगितले की, संरक्षण साहित्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा आगामी काळ उज्ज्वल आहे, असे गुंतवणूकदारांना वाटते. संरक्षण क्षेत्रातील ज्या कंपन्यांच्या शेअरच्या भावात वाढ झाली. त्यामध्ये भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हिंदुस्थान ऍरोनॉटिक्‍स, ऍस्ट्रा मायक्रोवेव्ह प्रॉडक्‍टस्‌, भारत डायनामिक्‍स या कंपन्यांचा समावेश होता.

आज औषधी क्षेत्रातील कंपन्यांही तेजीत होत्या. या कंपन्यांचे काम लॉकडाऊनमध्ये चांगले झाले आहे. त्याचबरोबर आगामी काळातही भारतीय औषधी क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे. भारतातील कंपन्या देशांतर्गत गरजा पूर्ण करण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात निर्यातही करतात.

सोमवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्‍स 141 अंकांनी म्हणजे 0.37 टक्‍क्‍यांनी वाढून 38,182 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 56 अंकांनी वाढून 11,270 अंकांवर बंद झाला.

जागतिक शेअरबाजारातूनही सकारात्मक संदेश आल्यामुळे आज आरोग्य, भांडवली वस्तू व ऊर्जा क्षेत्राचे निर्देशांक 4.69 टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. मात्र, आज तेल आणि नैसर्गिक वायू क्षेत्राला विक्रीचा फटका बसून या क्षेत्रांचे निर्देशांक कमी झाले. छोट्या कंपन्यांच्या भावावर आधारित मिडकॅप आणि स्मॉलकॅप दीड टक्‍क्‍यांपर्यंत वाढले.

सिप्ला तेजीत
औषधी क्षेत्रातील सिप्ला कंपनीचा नफा 26 टक्‍क्‍यांनी वाढवून 566 कोटी रुपये झाला आहे. याची सकारात्मक दखल गुंतवणूकदारांनी घेतल्यामुळे या कंपनीच्या शेअरला मागणी होती परिणामी या कंपनीचा शेअर सोमवारी नऊ टक्‍क्‍यांनी वाढून 795 रुपयांवर गेला. औषधांच्या इतर कंपन्यांचे शेअरही आज तेजीत होते. एल अँड टी कंपनीचा शेअरही आज जवळजवळ पाच टक्‍क्‍यांनी वाढला.

Leave A Reply

Your email address will not be published.